सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : “केवळ मराठा समाजाच्याच नव्हे तर सर्वच जातीतील लोकप्रतिनिधींच्या मतदारसंघात मराठा समाज आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी या नात्याने भेदभाव करणं त्यांच्या प्रतिमेला शोभत नाही. दुसऱ्याचं आरक्षण काढून आम्हाला देऊ नका पण जसं इतरांना न्याय दिला तसा आम्हालाही न्याय मिळायला हवा. प्रत्येकाला वाटतं की मराठा समाज सधन आहे. मात्र, शेतमजूर कष्टकरी मराठा समाजाची अवस्था बिकट आहे. त्यासाठी आरक्षण गरजेचं आहे, असे प्रतिपादन भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी केले
सातारा जिल्हा बॅंकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात गुरुवारी अण्णासाहेब पाटील विकास फाउंडेशनची स्थापना झाली. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार शिवेंद्रसिंहराजे राजे भोसले, माजी आमदार व माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील, माजी आमदार दिलीप येळगावकर व मान्यवर उपस्थित होते
उदयनराजे म्हणाले, निवडणुका दर पाच वर्षांनी होतच असतात त्यामुळे मराठा समाजानं हे लक्षात घ्याव की, जर लोकप्रतिनिधी तुमच्या अधिकाऱांसाठी तुम्हाला साथ देणार नसतील तर तुम्ही अशा लोकांच्या पाठीशी उभं राहता कामा नये, मराठा समाजाचा प्रश्न सुप्रीम कोर्टात असताना तिथे बाजू मांडता सरकारचे वकील वेळेवर हजर राहत नाहीत, हे जाणीवपूर्वक केल्यासारखचं दिसून येतं. पण हे नक्की का होतं हे माहिती नाही. सरकारमधील सर्व नेते मंडळींना माझी एकच विनंती आहे की, त्यांनी मराठा समाजाचा अंत पाहू नये कारण जर एकदा त्यांचा उद्रेक झाला तर त्याला थांबवणार कोण?
अण्णासाहेब पाटील यांच्या कार्याचा गौरव करताना उदयनराजे म्हणाले, “अण्णासाहेब हे छोट्याशा खेड्यात जन्माला आले. छत्रपती शिवाजी महाराजांनी जसं मुठभर लोकांना घेऊन समाजाला दिशा देण्याचं काम केलं, त्याप्रमाणे त्यांचाच विचार घेऊन आण्णासाहेबांनी देखील संपूर्ण आयुष्य वेचलं. ज्या असंघटीत कामगार वर्गाने आपल्या उदरनिर्वाहासाठी मोठ्या शहरांकडे धाव घेतली, त्या ठिकाणी त्यांना संघटित करुन सुरक्षित करण्याचं काम आण्णासाहेब पाटलांनी केलं.”
You must be logged in to post a comment.