दीपक प्रभावळकर यांना मराठी पत्रकार परिषदेचा पुरस्कार जाहीर

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने दिला जाणारा प्रतीष्ठेचा दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर जीवन गौरव पुरस्कार यंदा ज्येष्ठ पत्रकार तथा मार्मिकचे माजी संपादक पंढरीनाथ सावंत यांना व पत्रकार प्रमोद भागवत स्मृती पुरस्कार दैनिक तरूण भारतचे सातारा येथील आवृत्ती प्रमुख दीपक प्रभावळकर यांना जाहीर करण्यात आला आहे.

उरूळी कांचन येथे होणारया परिषदेच्या अधिवेशनात पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख यांनी एका प़सिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे. परिषदेच्या अन्य पुरस्कारांची घोषणा देखील आज करण्यात आली आहे.

मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने दरवर्षी राज्यातील पत्रकारांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येते. दर्पणकारांच्या नावाने दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार यापुर्वी मा. गो. वैद्य, दिनू रणदिवे तसेच अन्य ज्येष्ठ पत्रकारांना देण्यात आला होता. यावर्षी पंढरीनाथ सावंत यांना या पुरस्काराने गौरविण्यात येत आहे. पंढरीनाथ सावंत यांनी मार्मिकसह विविध दैनिकातून संपादक म्हणून उल्लेखनिय कार्य केले आहे. सामांन्याची बाजू घेत त्यांनी आयुष्यभर अत्यंत निष्ठेने पत्रकारिता केली. लेखक म्हणूनही पंढरीनाथ सावंत ख्यातकीर्त आहेत..

परिषदेचे अन्य पुरस्कारही आज जाहीर करण्यात आले आहेत.आचार्य अत्रे यांच्या नावाने विद्यमान संपादकाला दिला जाणारा पुरस्कार झी – 24 तास चे संपादक निलेश खरे यांना, सावित्रीबाई फुले यांच्या नावाने महिला पत्रकारास दिला जाणारा पुरस्कार मृणालिनी नानिवडेकर यांना,, उद्योगपती रावसाहेब गोगटे यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार पालघर येथील ज्येष्ठ पत्रकार सकाळचे अच्युत पाटील यांना, नागोरावजी दुधगावकर स्मृती पुरस्कार वसमत येथील गाववाला दैनिकाचे संस्थापक संपादक उत्तमराव दगडू यांना, दत्ताजीराव तटकरे स्मृती पुरस्कार कृषीवलचे वृत्तसंपादक भारत रांजनकर यांना, पत्रकार प्रमोद भागवत स्मृती पुरस्कार दैनिक बेळगाव तरूण भारतचे सातारा येथील आवृत्ती प्रमुख दीपक प्रभावळकर यांना आणि पत्रकार शशिकांत सांडभोर स्मृती पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार दीपक कैतके यांना जाहीर करण्यात आला आहे. अकोल्याचे पत्रकार भगवंतराव इंगळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा पुरस्कार दैनिक देशोन्नतीचे बुलढाणा आवृत्ती प़मुख राजेंद्र काळे यांना जाहीर करण्यात आला आहे.


मराठी पत्रकार परिषदेचे द्वैवार्षिक अधिवेशन २७ आणि २८ डिसेंबर रोजी पुण्याजवळ उरूळी कांचन येथे होत आहे. या अधिवेशनात मान्यवरांच्या हस्ते वरील सर्व पत्रकारांना सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती एस.एम.देशमुख, विश्‍वस्त किरण नाईक, अध्यक्ष गजानन नाईक, कार्याध्यक्ष शरद पाबळे, सरचिटणीस संजीव जोशी कोषाध्यक्ष विजय जोशी,सोशल मिडिया परिषदेचे राज्य प़मुख बापुसाहेब गोरे, राज्य महिला आघाडीच्या संघटक जान्हवी पाटील, राज्य प़सिध्दी प्रमुख अनिल महाजन यांनी एका प़सिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.पुरस्कार प्राप्त सर्व पत्रकारांचे एस. एम.देशमुख यांच्यासह सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पाटणे, सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, वरीष्ठ पत्रकार शरद काटकर, दीपक शिंदे,तुषार भद्रे, राहुल तपासे, सुजित आंबेकर यांनी अभिनंदन केले आहे.

error: Content is protected !!