महाविकास आघाडीतून अमित कदम यांना उमेदवारी ; मंगळवारी अर्ज दाखल करणार
सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा,) : सातारा-जावलीतील परिवर्तनासाठी हाती मशाल घेतली असून महाविकास आघाडीच्या माध्यमातून उमेदवारी मिळाल्याने जनतेच्या पाठिंब्यावर व महाआघाडीतील घटक पक्षाचे नेते व पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विधानसभा निवडणुकीत आता बदल घडवणारच, असा विश्वास ‘उबाठा’चे उमेदवार अमित कदम यांनी व्यक्त केला आहे.
महाविकास आघाडीच्या माध्यमातून सातारा-जावली विधानसभा मतदारसंघांमध्ये अमित कदम यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने उमेदवारी जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर ‘भूमिशिल्प’शी वार्तालाप करताना श्री. कदम यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली.
सातारा – जावली हा परिसर ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असून यावेळी या मतदारसंघात ‘धनशक्ती विरुद्ध जनशक्ती’ असा लढा रंगणार आहे. सर्वसामान्य जनता व दबलेले-पिचलेले कार्यकर्ते मलाच संधी देतील, अशी मला खात्री आहे. असेही श्री.कदम म्हणाले.
यापूर्वीच्या तीन विधानसभा निवडणुकीत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना फारसा राजकीय मुद्दा घेऊन लढावे लागले नाही. अनेकांची त्यांना आपोआपच साथ मिळत गेली. मात्र यंदाच्या निवडणुकीत अनेक समीकरणे बदलल्यामुळे राजकीय मुद्दे बाजूला झालेले आहेत. आणि खऱ्या अर्थाने विकास कामाबाबत मतदारांमध्ये चर्चा सुरू झालेली आहे.
महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अमित कदम यांनी वेळोवेळी अनेक राजकीय पक्ष बदलून उबाठा शिवसेनेकडून उमेदवारी मिळवली असली तरी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सुद्धा पक्ष बदलल्याचे उदाहरण महाविकास आघाडीचे प्रचारक आत्तापासूनच सांगत आहेत.
सातारा जावली मतदारसंघातील महायुती व महाविकास आघाडी या दोन्हीकडील उमेदवार आमदार पुत्रच आहेत. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे वडील (कै.) अभयसिंहराजे भोसले यांनी विधानसभा सदस्यत्व, राज्य मंत्रिमंडळातील मंत्री तसेच लोकसभेचे खासदार म्हणून राजकीय कारकीर्द गाजवली होती. तर अमीत कदम यांचे वडील जी. जी. कदम यांनीही पूर्वाश्रमीच्या जावली मतदारसंघाचे आमदार म्हणून विधानसभेत जावली- महाबळेश्वर तालुक्याचे नेतृत्व केले होते. या पार्श्वभूमीवर सातारा जावली मतदारसंघातील यावेळची विधानसभा निवडणूक दोन आमदार पुत्रांमध्ये होत असून याची जाणकार नागरिकांसह कार्यकर्त्यांमध्ये मोठी चर्चा सुरू आहे. शिवसेना उबाठा गटातून युवा नेते अमित कदम यांची उमेदवारी निश्चित झाल्याने या मतदारसंघामध्ये सुरुवातीला एकतर्फी वाटणारी निवडणूक आता तुल्यबळ लढतीच्या दिशेने होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान, विद्यमान आमदार व महायुतीचे उमेदवार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे सोमवार, दि.२८ रोजी तर महाविकास आघाडीचे उमेदवार अमित कदम हे मंगळवार, दि.२९ रोजी आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. दोन्ही आघाड्यांमधील कार्यकर्त्यांनी व नेते मंडळींनी त्यासाठी जोरदार तयारी केल्याचे दिसून येत आहे.
You must be logged in to post a comment.