मतदार जनजागृतीसाठी प्रशासनाचा अभिनव उपक्रम
सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा): स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदार यादीनिहाय १०० टक्के कुटुंबांपर्यंत पोहचून मतदानाच्या शेवटच्या तासापर्यंत मतदार जनजागृतीचे कामकाज करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.यासाठी जिल्ह्यात विविध उपक्रम आयोजित करून नागरीकांमध्ये जनजागृती करणे व मतदानाची टक्केवारी वाढविणेकरिता उपक्रमांचा एक भाग म्हणून शनिवार दिनांक ४ मे हा दिवस ‘मतदार गृहभेट’ दिवस म्हणून राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी दिली.
श्रीमती नागराजन म्हणाल्या, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्था व्यापक जनसंपर्क असणाऱ्या ,विस्तारीत प्रशासकीय यंत्रणा असल्याने यांच्याकडील सर्व अधिकारी, कर्मचारी शनिवारी दि.४ मे रोजी नेमून दिलेल्या ठिकाणी किंवा मुख्यालयी किंवा त्यांचे निवासाचे परिसरात गृहभेटी देवून मतदानाविषयी जनजागृतीचे काम करणार आहेत.
मतदानाच्या दिवशी शेवटच्या तासापर्यंत मतदानाचे कर्तव्य बजावण्यासाठी गावपातळीवर पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकात गाव पातळीवर ग्रामसेवक / कृषी सहाय्यक हे पथक प्रमुख असणार असून अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, आशा, ग्रामपंचायत कर्मचारी, प्राथमिक शिक्षक यांचा समावेश असणार आहे.हे पथक ग्रामपंचायतीमधील एकूण कुटुंबांची कुटुंबनिहाय विभागणी करुन प्रत्येक कुटुंबातील मतदारांपर्यत पोहचणार आहेत.
गावातील कुटुंबाची प्रत्यक्ष गृहभेटी या दि.३ मे ते ७ मे या मतदानाच्या दिवसापर्यंत सकाळी ९ वा. दुपारी २ वा.व सायं ५ वाजता अशा प्रकारे ३ वेळा करुन जास्तीत जास्त मतदार मतदानाचा हक्क बजावतील यासाठी कार्यरत राहणार आहेत.
या उपक्रमात तालुकास्तरावर व गावपातळीवर उत्कृष्ठ कामकाज करणाऱ्या कर्मचाऱ्याची निवड करुन जिल्हास्तरावर कळविण्यात येणार असून निवडणूक कामकाजानंतर त्यांचा विशेष प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात येणार आहे.
स्वीप कक्षाकडील अधिकृत डिजीटल मिडीयाद्वारे गावातील सोशल मीडीया ग्रुपवर हे पथक प्रचार व प्रसिध्दी करणार आहे. स्वीप कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरावरुन पुरविण्यात आलेली जनजागृतीसाठी माहितीपत्रकेही मतदारांपर्यंत या पथकाच्या माध्यमातून पोहचविण्यात येणार आहेत.
मतदान केंद्रावर दिव्यांग,जेष्ठ मतदारांना वाहतुक सुविधांबाबतचे नियोजन करण्यात आल्याची माहितीही श्रीमती नागराजन यांनी दिली आहे.
You must be logged in to post a comment.