महेश शिंदे यांना निवडणुकीत परमेश्वराने यश द्यावे : नरेंद्र पाटील

शिवेंद्रराजे, शंभूराज देसाईंच्या प्रचारासाठी येणार

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा) : कोरेगावचे आमदार महेश शिंदे हे मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय आहेत, अर्थात त्यामुळे ते स्ट्रॉंग आहेतच आणि त्यांचा जनसंपर्कही फार मोठा आहे. निवडणुकीच्या प्रक्रियेत ते फार पुढे गेलेले आहेत. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत निश्चितच त्यांना परमेश्वराने यश द्यावे, अशी प्रतिक्रिया माथाडी कामगारांचे नेते,अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी ‘भूमिशिल्प’ शी बोलताना व्यक्त केली आहे.

कोरेगाव मतदारसंघातील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मध्यंतरी कोरेगावात दाखल झाल्याने आणि आमदार शशिकांत शिंदे यांच्या गाडीचे सारथ्य केल्याने संपूर्ण राज्यात मोठी चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर विचारलेल्या प्रश्नांवर बोलताना नरेंद्र पाटील म्हणाले की, मी व शशिकांत शिंदे दोघेही माथाडी युनियनमधील जबाबदार पदाधिकारी आहोत. एका युनियनमध्ये आम्ही काम करतो त्यामुळे आमच्या पदाधिकाऱ्यांनी ठरवले त्याप्रमाणे त्यांचा फॉर्म भरण्यासाठी मी आलो.त्याबाबतची भूमिका माझे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी सांगितली होती.

लोकसभा आणि विधानसभा अशा दोन वेगळ्या भूमिकेबद्दल बोलताना ते म्हणाले की,२०१९ च्या निवडणुकीत मला पाडण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि त्यात ते यशस्वीही झाले. मात्र जिल्हा बँकेत पक्ष, गट तट न पाहता जिल्ह्यातील नेते एकमेकांचे विरोधात फॉर्म भरतात, आणि नंतर पप्पीसुद्धा घेतात. कराड बाजार समितीच्या वेळी बाळासाहेब पाटलांशी चर्चा करतात. मग मी माथाडी युनियन मधील माझ्या सहकाऱ्याचा फॉर्म भरण्यासाठी आलो तर त्यात काय बिघडले? मी केवळ त्यांचा फॉर्म भरण्यासाठीच आलो ना? त्यापुढे तर गेलो नाही. मी काहीही चुकीचे किंवा वाईट केलेले नाही. मी माझ्या पातळीवर बरोबरच आहे. शशिकांत शिंदे हे मॅच्युअर्ड पॉलिटिशन आहेत. अर्ज भरल्यानंतर त्यांच्या त्यांच्या बाजूने ते प्रयत्न करणार हे स्वाभाविकच आहे. त्यांची त्यांना स्पेस मिळणे, यात काहीच गैर नाही.

आमदार महेश शिंदे यांच्याशी बोलणे झाले का? याबाबत ते म्हणाले,महेश शिंदे यांनी आपणास त्यानंतर फोनही केलेला नाही किंवा स्वतःहून संपर्कही झालेला नाही, मात्र ते निवडणुकीच्या प्रक्रियेत फार पुढे गेलेले आहेत.

दरम्यान, सध्या राज्यभरात प्रचार दौरे करत असून निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात आपण महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी निश्चितच सातारा जिल्ह्यात प्रचारासाठी येणार आहे.साताऱ्यात भाजपाचे शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि पाटणमध्ये शिवसेनेच्या शंभूराज देसाई यांच्या निवडणूक प्रचारासाठी उपस्थित राहणार आहे.असेही नरेंद्र पाटील यांनी बोलताना सांगितले.

error: Content is protected !!