मायणी पक्षी अभयारण्यात वणवा

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : मायणी पक्षी अभयरण्यात गुरुवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास शाॅकसर्किटमुळे वन उद्यानाच्या पूर्व बाजूस मायणी म्हसवड मार्गालगत असलेल्या परिसरात आग लागली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वनसंपदेचे नुकसान झाले आहे.

खटाव तालुक्यातील हे गाव पक्षी अभयारण्यासाठी प्रसिद्ध आहे. गावापासून २ कि.मी. अंतरावर ब्रिटिशकालीन तलाव आहे. येथे अनेक पाणपक्षी दिसतात. तसेच स्थलांतरित पक्षीही येतात. स्थलांतरीत पक्ष्यांमध्ये रोहीत पक्ष्यांचे थवे हे विशेष आकर्षण असते. त्याशिवाय चक्रवाक, पट्टकदंब, हळद-कुंकू ही बदकेही आढळतात. कापशी घार, गरुड, दलदल ससाणा असे शिकारी पक्षी देखील येथे आहेत.नदी सूर्य, खंड्या,कवड्या,राखी बगळा, वंचक, चित्रबलाक असे पाणपक्षी सुद्धा आढळतात.

मायणी या संवेदनशील गावात ब्रिटिश कालीन तलाव व पक्षी आश्रयस्थान या ऐतिहासिक निसर्ग संपदेचा परिसर अनेक ठेव्यानी भरलेला आहे. मायणी ब्रिटिश कालीन तलावाजवळ सुमारे ६५ हेक्टर क्षेत्रावर मायणी वनउद्यान आहे या वन उद्यानामध्ये विविध जातीचे हजारो वृक्ष आहेत या वन उद्यानामध्ये आज गुरुवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किटने आग लागली. वनरक्षक असलेल्या संजीवनी खाडे यांच्यासह परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या आगीत सुमारे दोन एकर क्षेत्रातील शेकडो लहान-मोठी झाडे या आगीत भस्मसात झाली. दोन तासांच्या अथक प्रयत्नांनतर आग आटोक्यात आली. वर्षानुवर्षे या परिसरात विविध कारणांमुळे वनवा लागत असतो व यामध्ये शेकडो वृक्ष आगीच्या भक्ष्यस्थानी पडत असतात त्यामुळे याठिकाणी वणवे विझवण्यासाठी ठोस व कायमस्वरूपी उपाययोजना होणे गरजेचे आहे.

error: Content is protected !!