नगराध्यक्ष अमोल मोहिते उद्या कार्यभार स्वीकारणार

खा.उदयनराजे–ना. शिवेंद्रसिंहराजे यांच्या प्रमुख उपस्थितीत पदग्रहण

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन चार दिवस उलटले असले, तरी नगराध्यक्ष पदाचा कार्यभार अद्याप स्वीकारण्यात आलेला नव्हता. अखेर उद्या शुक्रवार, दि. २६ रोजी दुपारी ४ वाजता नवनिर्वाचित नगराध्यक्ष अमोल मोहिते हे पदभार स्वीकारणार आहेत. हा सोहळा खा. उदयनराजे भोसले आणि ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे.

नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी २ डिसेंबर रोजी मतदान झाले होते. तर २१ डिसेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर झाला. तत्पूर्वी अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी भाजपचे तीन नगरसेवक बिनविरोध निवडून आले. उर्वरित ४७ नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदासाठी मतदान झाले. २१ तारखेच्या निकालानंतर भाजपला नऊ जागांवर पराभव स्वीकारावा लागला. त्यापैकी आठ जागांवर अपक्ष, तर एका जागेवर शिवसेना (शिंदे गट) उमेदवार विजयी ठरला. मात्र या सर्व नगरसेवकांची विचारधारा उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे यांच्याशी सुसंगत असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, बुधवारी नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी पुणे येथे खा. उदयनराजे भोसले यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर कार्यभार स्वीकारण्याची तारीख निश्चित करण्यात आली. केसरकर पेठेतील सातारा नगरपरिषदेच्या कार्यालयात उद्या होणाऱ्या सोहळ्यास नवनिर्वाचित नगरसेवक-नगरसेविका, भाजप पदाधिकारी उपस्थित राहणार असून सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!