![](https://i0.wp.com/bhumishilp.com/wp-content/uploads/2022/02/IMG_20220209_193432.jpg?resize=720%2C262&ssl=1)
सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : खिरखंडी (ता. जावली) येथील मुलींच्या शिक्षणासाठीची धावपळ व विदारक परिस्थिती सर्वांच्या समोर आल्यानंतर प्रशासनासह सर्वजण कामाला लागले. पण, असुरक्षित अशी लाकडाची होडी चालवत या मुली येत असल्याने या मुलींना बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे व त्यांचे सुपूत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी स्वखर्चाने यांत्रिक बोट उपलब्ध करून दिली आहे. आज पहिल्यांदाच या मुलींनी या यांत्रिक बोटीतून प्रवास करत शाळा गाठली.
खिरखंडीतील मुलींच्या शिक्षणाबाबतची दुरवस्था सोशल मीडीयावर मांडली होती. या वृत्तानंतर या विषय माध्यमांनी उचलून धरल्याने मुंबई उच्च न्यायालयाला ही या मुलींची दखल घ्यावी लागली. दुर्गम बामणोली खोऱ्यातील खिरखंडी गावातून कोयना जलाशय पार करत पुन्हा अंधारीपर्यंत चार पाच किलोमीटरचा घनदाट जंगलातील प्रवास करत या मुली शाळेत पोहोचत होत्या.
ही परिस्थिती पाहून नुकतेच आपल्या मूळ दरे या गावी आलेल्या मंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांनी तात्काळ या मुलींना रोज शाळेत कोयना जलाशय पार करून सकाळी आणि संध्याकाळी सोडणे यासाठी एक यांत्रिक बोटी उपलब्ध करून दिली.
खासदार श्रीकांत शिंदे यांनी प्रत्यक्ष खिरखंडीला भेट देऊन लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांच्या या कामामुळे मुलींचा रोजचा होडी चालवण्याचा त्रास कमी झाला आहे. जिल्हा प्रशासनाने मुलींना फायबर बोट उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच काही सामाजिक कार्यकर्त्यांनी लाइफ जॅकेट उपलब्ध करून दिली आहेत. पण, सर्वांच्या अगोदर यांत्रिक बोट उपलब्ध करून दिल्याने या मुलींची मोठी अडचण दूर झाली आहे
You must be logged in to post a comment.