सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : जावली तालुक्यातील मेढा ग्रामीण रुग्णालयासाठी अद्यावत आणि आधुनिक सोयी सुविधांनी युक्त रुग्णवाहिका नसल्याने रुग्णांची मोठी गैरसोय होत होती. रुग्णांची ही गैरसोय आता कायमची दूर झाली असून या ग्रामीण रुग्णालयाला आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रयत्नांतून कायमस्वरूपी नवीन रुग्णवाहिका मिळली आहे. शुक्रवार दि. २८ रोजी ही रुग्णवाहिका मेढा ग्रामीण रुग्णालयात दाखल होणार आहे. कोरोना महामारीच्या काळात आधुनिक रुग्णवाहिका उपलब्ध झाल्याने या जावलीकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
जावली तालुक्यातील मेढा हे तालुक्याचे ठिकाण असून येथे शासनाचे ग्रामीण रुग्णालय आहे. या रुग्णालयाच्या अंतर्गत डोंगराळ आणि दुर्गम भागातील अनेक गावे असून या परिसरातील असंख्य रुग्ण उपचारासाठी या रुग्णालयात येत असतात. दरम्यान, या रुग्णालयाकडे आधुनिक सोयी सुविधांनी युक्त रुग्णवाहिका नसल्याने गंभीर परिस्थिती असलेल्या रुग्णांची मोठी गैरसोय होत असे. ही बाब निदर्शनास आल्यानंतर आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी या रुग्णालयाला नवीन रुग्णवाहिका मिळण्यासाठी पाठपुरावा सुरु केला.
मेढा ग्रामीण रुग्णालयाला आधुनिक रुग्णवाहिका तातडीने उपलब्ध व्हावी यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्यासह राज्याचे आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे यांच्याकडे मागणी करून पाठपुरावा केला. आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून शासनाने मेढा ग्रामीण रुग्णालयासाठी नवीन रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे. शुक्रवारी हि रुग्णवाहिका मेढा ग्रामीण रुग्णालयात दाखल होणार असून या रुग्णवाहिकेमुळे या भागातील रुग्णांची मोठी गैरसोय दूर होणार आहे. नवीन रुग्णवाहिका उपलब्ध झाल्याने समस्त जावलीकरांमधून समाधान व्यक्त होत आहे.