साताऱ्यातील मेडिकल कॉलेजला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा): साताऱ्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास ‘छत्रपती संभाजी महाराज’ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय असे नाव देण्यात येत असल्याचा निर्णय राज्य शासनातर्फे घेण्यात आला असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. दरम्यान, शासकिय वैद्यकीय महाविद्यालयाला स्वराज्याचे दुसरे छत्रपती श्रीमंत छत्रपती संभाजीमहाराज शासकिय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सातारा असे नांव देण्याचा राज्यशासनाने घेतलेल्या निर्णयाचे शिवछत्रपतींचे थेट तेरावे वंशज व खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी स्वागत केले आहे.

जानेवारी २०१२ झालेल्या शासकीय निर्णयानुसार साताऱ्यात १०० विद्यार्थी संख्या व ५०० घाटांचे रुग्णालय मंजूर झाले होते. त्यासाठीच्या जागेबाबत मतमतांतरे निर्माण झाल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे काम काहीसे रखडले होते, मात्र कृष्णा खोरे महामंडळाच्या जागेत हे महाविद्यालय व रुग्णालय होणार असल्याचे निश्चित झाल्याने व त्याबाबतच्या उभारणीसाठीच्या तांत्रिक बाबींनी गती घेतली आहे. पुढे नियमानुसार ५०० खाटांच्या अटींच्या पूर्ततेबरोबरच १०० खाटांचे स्वतंत्र स्त्री रुग्णालयही मंजूर करण्यात आले. तथापि मेडिकल कौन्सिलच्या आणि इतर संस्थांच्या अनेक क्लिष्ट निकषांची पूर्तता करण्यात तसेच महत्वाचे म्हणजे आवश्यक असणारी मोठी सोयीची जागा उपलब्घ करुन घेण्यात बराच कालावधी लोटल्यावर गतवर्षी सातारच्या वैद्यकिय महाविद्यालयाच्या पहिल्या वर्षाची प्रवेश प्रक्रीया सुरु झाली. सातारला वैद्यकिय महाविद्यालय सुरु झाल्याने, अनेक दृष्टीकोनामधुन सातारच्या सर्वांगिण विकासाच्या वाटचालीत जाणवण्याइतका लाभ दिसू लागला.

दरम्यान, या वैद्यकीय महाविद्यालयास “छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सातारा” असे नामाधिकरण करण्याबाबतचा शासनाचा आदेश निघाल्याने संपूर्ण जिल्ह्यातून आनंद व्यक्त होत आहे. सातारा ही शिवस्वराज्याची राजधानी व छत्रपती संभाजी महाराजांचे सुपुत्र छत्रपती शाहू महाराज यांनी वसवलेली ऐतिहासिक नगरी आहे. तसेच छत्रपती संभाजी महाराजांचे आजोळही सातारा जिल्ह्यातच असल्याने वैद्यकीय महाविद्यालयाला त्यांचे नाव देण्याचा घेतलेला निर्णय औचित्यपूर्ण आहे, अशी प्रतिक्रिया जाणकारांसह जनसामान्यातून व्यक्त होत आहे.

राज्य शासनाने शासन निर्णय क्रमांक वैशिवि-२०२३/प्र.क्र.११९/ प्रशासन-२ दिनांक ९ ऑगस्ट २०२३ रोजीच्या निर्णयाव्दारे सातारा वैद्यकीय महाविद्यालयाचे नामाधिकरण छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय करण्यात आल्याचे व त्या अनुषंगाने मा.आयुक्त वैद्यकिय शिक्षण व संशोधन संचालनालय, मुंबई यांनी पुढील कार्यवाही करावी असा आदेश प्रसिद्धीस दिला आहे.

खा.उदयनराजे भोसले यांच्याकडून नामाधिकरणाचे स्वागत

शासकिय वैद्यकीय महाविद्यालयाला स्वराज्याचे दुसरे छत्रपती श्रीमंत छत्रपती संभाजीमहाराज शासकिय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सातारा असे नांव देण्याचा निर्णय आज राज्यशासनाने घेतलेल्या निर्णयाचे शिवछत्रपतींचे थेट तेरावे वंशज व खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले यांनीही स्वागत केले आहे. याबाबतच्या प्रसिद्धीपत्रकात श्री.छ. उदयनराजे यांनी म्हटले आहे की, ऐतिहासिक सातारा नगरीतील वैद्यकिय महाविद्यालयासारख्या मोठया महत्वाच्या वास्तुस समर्पक नाव दिले गेल्याने छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्यकर्तुत्वाला योग्य तो सन्मान दिला गेला आहे. या महाविद्यालयाला “छत्रपती संभाजी महाराज” यांचे नांव देण्याबाबतची विनंती आम्ही राज्यशासनास सुमारे एक वर्षापूर्वी केली होती. तसेच जुलै महिन्यात उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या कराड देखिल सातारच्या शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नांव देण्याबाबत स्वतंत्र पत्र प्रस्ताव दिला होता, त्याची दखल घेतल्याबद्दल समाधान वाटते, असेही या पत्रकात त्यांनी म्हटले आहे.

या निर्णयाबद्दल उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, ना. अजित पवार, मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, व मंत्रीमंडळाचे सातारकर जनतेसह आणि व्यक्तीश: आभार मानत असल्याचेही खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे आभार मानले आहेत.

error: Content is protected !!