जिल्हा बँकेच्या अध्यक्ष पदी पुन्हा संधी मिळवण्यासाठी शिवेंद्रराजेंच्या गाठीभेटी

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा जिल्हा बॅंकेच्या अध्यक्ष पद मिळवण्यासाठी अनेकांनी मोर्चे बांधणी करण्यास सुरुवात केली आहे. त्यातच भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी काल मुंबई येथे मंत्रालयात जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यानंतर शरद पवार यांची भेट घेतली.

सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीनंतर अध्यक्षपदावर संधी मिळावी, म्हणून काही संचालकांमध्ये स्पर्धा सुरू आहे. यामध्ये आमदार मकरंद पाटील यांचे बंधू नितीन पाटील यांचे नाव आघाडीवर आहे. त्यासोबतच राष्ट्रवादीतून पाटणचे सत्यजितसिंह पाटणकर, महाबळेश्वरचे राजेंद्र राजपुरे हेही इच्छुकांच्या रेसमध्ये आहेत. त्यासोबतच विद्यमान अध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले हेही इच्छुक आहेत. मागील पाच वर्षे सर्वांना एकत्र घेऊन त्यांनी काम केलेले आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा संधी मिळावी, अशी त्यांचीही अपेक्षा आहे. या सर्व पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे प्रमुख नेते मुंबईत ठाण मांडून आहेत.  काल दुपारी दोनच्या सुमारास शिवेंद्रसिंहराजे यांनी उपमुख्यमंत्री पवार यांची मंत्रालयात भेट घेतली. यावेळी त्यांच्यासमवेत बॅंकेचे संचालक अनिल देसाई उपस्थित होते.

error: Content is protected !!