‘वेणुग्राम’ प्रकल्पामुळे जिल्हा बँक कर्मचाऱ्यांचे ‘घरकुल स्वप्न’ पूर्ण होईल : ना. मकरंद पाटील

साताऱ्यातील महत्त्वाकांक्षी गृहप्रकल्पाची केली पाहणी; २८० कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा): सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांचे स्वतःच्या घराचे स्वप्न आता लवकरच प्रत्यक्षात उतरणार आहे. जिल्हा बँकेच्या ‘वेणुग्राम गृहनिर्माण प्रकल्पा’ची मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी नुकतीच पाहणी केली. हा प्रकल्प बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी स्वप्नवत संधी असून, सर्वांना परवडणाऱ्या दरात निवासाची हमी देणारा उपक्रम आहे, असे मंत्री पाटील यांनी यावेळी सांगितले.

साताऱ्यातील स्टँडसमोर मोक्याच्या ठिकाणी सुमारे पाच एकर जागेत उभारला जात असलेला हा प्रकल्प, कंग्राळकर इन्फ्रास्ट्रक्चर मार्फत विकसित करण्यात येत आहे. यामध्ये १०१३ चौ. फुटांचे २८० फ्लॅट्स बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी बांधले जाणार आहेत. हे सर्व फ्लॅट्स आधुनिक सोयीसुविधांनी युक्त असणार आहेत.माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पत्नी (कै.) वेणूताई चव्हाण यांच्या स्मरणार्थ जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांनी वेणुग्राम गृहनिर्माण संस्था स्थापन केली. संस्थेच्या माध्यमातूनच हा प्रकल्प आकार घेत आहे.मंत्री मकरंद पाटील यांच्या उपस्थितीत सॅम्पल फ्लॅटचे उद्घाटनही पार पडले.

यावेळी बांधकाम व्यावसायिक श्रीधर कांग्राळकर, बँकेचे माजी संचालक राजेश पाटील-वाठारकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मनोज देशमुख, मराठा बिझनेस फोरमचे जगदीश शिर्के, सरव्यवस्थापक राजीव गाढवे व राजेंद्र भिलारे, उपव्यवस्थापक विमलाकर कारंडे, व्यवस्थापक जयवंत पवार, संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र गायकवाड, सचिव राहुल डेरे तसेच इतर पदाधिकारी व बँकेचे सेवक उपस्थित होते.

प्रकल्पाच्या पुढील टप्प्यात ‘लँडमार्क बिझनेस पार्क’ ची उभारणीही करण्यात येणार असल्याचे मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले. हा प्रकल्प साताऱ्याच्या शहरी विकासात एक महत्त्वाची भर घालेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

error: Content is protected !!