सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : कोविड बाधीत रुग्णांचा पॉझीटीव्हीटी रेट व ऑक्सिजन बेडस व्यापलेची टक्केवारीच्या निकषानुसार सातारा जिल्हयाचा तिसऱ्या स्तरामध्ये समाविष्ट होत आहे. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आज जाहीर केलेल्या आदेशानुसार सर्व दुकानांना सोमवार ते शुक्रवारी सुरु ठेवण्यास येणार आहेत.
सर्वसाधारण मार्गदर्शक तत्वानुसार सातारा जिल्हयामध्ये आठवडयाचे सर्व दिवशी सकाळी 5.00 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत जमावबंदी व सायंकाळी 5.00 वाजलेपासून ते सकाळी 5.00 वाजेपर्यंत संचार बंदी लागू करण्यात येत आहे. त्यामुळे संचारबंदीच्या वेळेत वैध कारणाशिवाय कोणत्याही व्यक्तीस संचार करण्यास मनाई करण्यात येत आहे. सातारा जिल्हयातील सर्व शाळा, महाविदयालये, कोचिंग क्लासेस पुर्णपणे बंद राहतील. तथापि, ऑनलाईन शिक्षणास परवानगी असेल. तसेच वैदयकीय महाविदयालये, नर्सिंग कोर्सेस चालू ठेवण्यास परवानगी असेल.
अत्यावश्यक बाबीची दुकाने, आस्थापना या आठवडयाचे सर्व दिवशी सकाळी 9.00 ते सायं 04.00 वा पर्यत चालु ठेवण्यास परवानगी असेल. मात्र मेडिकल, औषधांची दुकाने सकाळी 9.00 ते रात्रौ 8.00 वाजेपर्यंत चालू राहतील. तथापि, हॉस्पीटल मधील मेडिकल, औषधांची दुकाने पुर्णवेळ चालू ठेवण्यास परवानगी असेल. अत्यावश्यक नसलेली दुकाने,आस्थापना ही सोमवार ते शुक्रवार सकाळी 09.00 ते सायं. 04.00 वा पर्यंत चालू ठेवण्यास परवानगी असेल. मॉल, सिनेमागृहे (एक किंवा अनेक पडदी)/ नाटयगृहे इ. पुर्णपणे बंद राहतील.
सोमवार ते शुक्रवार सकाळी 07.00 ते सायं 04.00 या कालावधीत हॉटेल, रेस्टॉरंटस् यांना आसन क्षमतेच्या 50% क्षमतेने चालू ठेवण्यास परवानगी असेल. तसेच आठवडयाचे सर्व दिवशी सकाळी 07.00 ते रात्रौ 08.00 या कालावधीत घरपोच पार्सल सेवा चालू ठेवण्यास परवानगी असेल. लॉजिंग, बोर्डींग चालू ठेवण्यास परवानगी असेल. तसेच लॉजिंग मध्ये वास्तव्यास असलेल्या व्यक्तींना सकाळी 07.00 ते सायं 04.00 या कालावधीतच रेस्टॉरंट मध्ये सेवा देता येईल व त्यानंतर त्यांचे वास्तव्य असलेल्या रुम मध्ये सेवा पुरविणे बंधनकारक असेल.
सार्वजनिक जागा/खुली मैदाने/ चालणे/सायकल चालविणे साठी आठवडयाचे सर्व दिवशी सकाळी 05.00 ते सकाळी 09.00 या वेळेत परवानगी असेल. सर्व खाजगी कार्यालयांना सायंकाळी 4.00 वाजेपर्यंत 50 टक्के क्षमतेने चालू ठेवण्यास परवानगी असेल. शासकीय/निम-शासकीय कार्यालये 50 टक्के क्षमतेने चालू ठेवण्यास परवानगी देणेत येत आहे. खुल्या जागेतील क्रिडा विषयक बाबी या आठवडयाचे सर्व दिवशी सकाळी 05.00 ते सकाळी 09.00 या वेळेत चालू ठेवण्यास परवानगी असेल. मात्र कोणत्याही क्रिडासंबंधी स्पर्धा आयोजित करणेस मनाई असेल. चित्रीकरण – आयसोलेशन बबलमध्येच चित्रीकरण व वास्तव्य करणे बंधनकारक राहील. कोणतेही गर्दीचे व गर्दी होईल, असे चित्रीकरण करता येणार नाही. तसेच आयसोलेशेन बबलच्या बाहेर सायंकाळी 05.00 नंतर कोणालाही संचार, प्रवास करता येणार नाही. सामाजिक सांस्कृतिक, धार्मिक/प्रार्थना स्थळे, करमणुक कार्यक्रम, मेळावे हे जागेच्या इत्यादी पुर्णपणे बंद राहतील. तथापि सर्व धार्मिक आणि प्रार्थना स्थळामध्ये धार्मिक सेवा करणारे सेवेकरी यांना त्यांच्या पारंपारीक / धार्मिक सेवा करता येतील. यावेळी कोणत्याही बाहेरील भक्तांस प्रवेश असणार नाही. मात्र शासकीय कार्यक्रमांसाठी जागेच्या 50% क्षमतेने आयोजीत करणेस परवानगी असेल.
You must be logged in to post a comment.