जिल्ह्याच्या विकासासाठी कार्यक्षम आ.पाटील यांच्या मंत्रिपदाचा फायदा
सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा) : महायुतीच्या घटक पक्षांना महाराष्ट्रामध्ये घवघवीत यश मिळाले आहे.साताऱ्यात महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकसंघपणे काम केले .वाई,खंडाळा,महाबळेश्वर मध्ये आमदार मकरंद पाटील यांनी आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. त्यांना मंत्रिमंडळात कॅबिनेट दर्जाचे मंत्रीपद मिळावे अशी मागणी राष्ट्रवादी अजितदादा गटाचे वैद्यकीय सहायता कक्षाचे राज्य उपाध्यक्ष सागर भोगावकर यांनी केली आहे.
राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराच्या संदर्भाने महायुतीच्या घटक पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची चर्चा सुरू आहे.सातारा जिल्ह्यात महायुतीने आठ विधानसभा मतदारसंघात त्यांचे आमदार निवडून आणले आहेत.त्यामुळे सातारा जिल्ह्याला मंत्रिमंडळ विस्तारात मानाचे स्थान मिळावे, अशी सर्वांचीच अपेक्षा आहे.यामध्ये भारतीय जनता पार्टीच्यावतीने आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, शिंदे गटाच्या वतीने आमदार शंभूराज देसाई व राष्ट्रवादी अजित दादा पवार गटाच्या वतीने आमदार मकरंद पाटील यांची मंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे.
या संदर्भाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात नमूद आहे की, विकास कामांचा योग्य प्रचार, कार्यकर्त्यांचे संघटन कौशल्य आणि एकदिलाने विकास कामांचा झालेला प्रचार यामुळे महायुतीने राज्यात २३५ जागा निर्विवादपणे मिळवल्या आहेत.अजित दादा पवार गटाने सुद्धा ३९ जागा मिळवून राज्यातील आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.वाई,खंडाळा,महाबळेश्वर मतदारसंघातून आमदार मकरंद पाटील यांनी आपल्या मतदारसंघात केलेल्या विकास कामांच्या जोरावर निर्विवादपणे यश मिळवले.राष्ट्रवादी अजितदादा गटाची त्यांच्या निमित्ताने जिल्ह्यात बांधणी मजबूत झाली असून त्यांना मंत्रिमंडळात कॅबिनेट दर्जाचे मंत्रीपद मिळावे ही कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे.राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अध्यक्ष अजित पवार हे परखड शैलीचे नेते असून ते दिलेला शब्द निश्चित पाळतात हा सर्वानुभव आहे.
आ.मकरंद पाटील यांना मंत्रिमंडळात कॅबिनेट दर्जाचे मंत्रीपद मिळाल्यास सातारा जिल्ह्यासह वाई, खंडाळा, महाबळेश्वर या मतदारसंघाच्या पुढील विकासासाठी त्याचा फायदा होणार आहे.आबांचे संघटन कौशल्य आणि विकास कामे करताना धडकपणे काम करण्याची कार्यक्षमता यामुळे त्यांना मंत्रिमंडळात संधी मिळावी .ती मिळाल्यास त्या विभागाला ते योग्यपणे न्याय देतील असा विश्वास सागर भोगावकर यांनी पत्रकात व्यक्त केला आहे.
You must be logged in to post a comment.