घाणबी विभागात मोबाईल टॉवर उभारणार

खासदार उदयनराजे भोसले यांचे कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्यात आश्वासन

पाटण,(भूमिशिल्प वृत्तसेवा): लोकसभा निवडणुकीनंतर घाणबी विभागात मोबाईल टॉवर उभारून हा परिसर संपर्क क्षेत्रात आणला जाईल, असे आश्वासन महायुतीचे लोकसभा उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांनी दिले.

घाणबी तालुका पाटण येथे कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, घाणबीचे सरपंच प्रकाश सपकाळ, सुभाष शिर्के, रामभाऊ पवार, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख जयवंतराव शेलार, बाळासाहेब पाटील, गणपती यादव, मिलिंद पाटील, अमोल जगताप, विठ्ठल जगताप यांची प्रमुख उपस्थित होती.

उदयनराजे भोसले म्हणाले, या परिसरात पूर्वी आलो होतो तेव्हाची आणि आत्ताची परिस्थिती यामध्ये जमीन अस्मानाचा फरक जाणवतो आहे. शंभूराज देसाई यांनी हा सर्व परिसर  डांबरी रस्त्याने जोडून या परिसराचा कायापालट हाती घेतला आहे. या परिसरातील अनेक लोक पुणे ,मुंबई, ठाणे या परिसरात वास्तव्यास आहेत. या परिसरामध्ये मोबाईल टॉवरला रेंज नसल्यामुळे अनेकदा कठीण प्रसंगात अनेक संकटांना सामोरे जावे लागते. या विभागाचे आमदार व पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या बरोबरीने या परिसरामध्ये मोबाईल टॉवर उभारण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे, असे उदयनराजे म्हणाले.

शंभूराज देसाई म्हणाले, या भागात दळणवळणाची साधने नव्हती. डोंगरी विकास परिषदेच्या माध्यमातून आम्ही येथील विकास सुरू केला. विकास कामासाठी निधी कमी पडू देणार नाही. या भागातील एक एक मत आपल्याला महत्त्वाचे आहे. निवडणुकीत उदयनराजेंना मोठे मताधिक्य  देण्याची जबाबदारी आपण घेतलेली आहे. ती पार पाडुया असे ना.देसाई म्हणाले.

error: Content is protected !!