मोरणा विभागाला निधी कमी पडू देणार नाही : उदयनराजे भोसले

मोरगिरी येथे मोरणा विभागातील कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा

मोरगिरी,(भूमिशिल्प वृत्तसेवा): पाटण मतदारसंघाचे कार्यकुशल नेतृत्व शंभूराज देसाई यांनी विकास कामांचा विडा उचलला आहे. सर्वांनी एकीने काम करूया, विभागाला निधी कधी कमी पडू देणार नाही,असा ठाम निर्धार खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला.

मोरगिरी येथे मोरणा विभागातील कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, माजी जिल्हा परिषद सदस्य बशीर खोंदू , सुगरा खोंदू, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष जयवंतराव शेलार, किशोर गुरव, संदीप कोळेकर, अविनाश नांगरे,आनंदा भोसले, विक्रम देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती.

उदयनराजे पुढे म्हणाले, डोंगरी विभागात काम करणे तसे अवघडच काम असते. परंतु या भागाचा विकास करण्याचा विडा देसाई यांनी उचलला असल्यामुळे अनेक विकास कामे या भागात झाली आहेत. केंद्र शासनाकडून आपल्याला मोठी मदत मिळत आहे. जनतेने साथ दिल्यास आणखी वेगाने प्रगती होत राहणार आहे.

शंभूराज देसाई म्हणाले, मोरगिरी परिसरातील पठारावरील गावामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असला , तरी उन्हाळ्यात या ठिकाणी पाण्याचे दुर्भिक्ष असते. पठारावरील गावांमध्ये जलयुक्त शिवार सारख्या योजना राबवून पाणी साठवण्याची व्यवस्था करण्याचे काम आपण भविष्यात करणार आहोत. लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्ही  विधानसभेला जसे  काम करता, तसेच काम करा आणि खासदार उदयनराजे भोसले यांना विजयी करा,असे आवाहन केले.

error: Content is protected !!