पाचवड येथील प्रचार सभेत आ.शशिकांत शिंदे यांना विजयी करण्याचे आवाहन
कुडाळ,(भूमिशिल्प वृत्तसेवा): सातारा लोकसभा मतदारसंघातील मतदार फार नशीबवान आहेत. त्यांना दोन उमेदवार निवडून देण्याचा अधिकार मिळणार आहे. या निवडणुकीत छत्रपती राजघराण्यातील राजगादीचे वारस आहेत. ते राज्यसभेत आणि लोकनेते असलेले आ.शशिकांत शिंदे हे लोकसभेत असतील. माझ्या मनातील राजगादीचा अभिमान व आदर कधीच कमी होणार नाही. पण सातारकरांचं ठरलंय छत्रपतींच्या गादीला मुजरा करायचा आणि दिल्लीत तुतारी वाजवायची. व्यक्तिगत संबंध वेगळे आणि राजकीय भूमिका वेगळी असून ‘महाराज साहब आपके गैर नही, लेकीन बीजेपी तेरी खैर नही,’ हे आता सातारकरांनी ठरवलंय, असा घणाघात खा.अमोल कोल्हे यांनी केला.
पाचवड ता.वाई येथे महाविकास आघाडीचे सातारा लोकसभेचे उमेदवार आ.शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या जाहीर सभेत खा.अमोल कोल्हे बोलत होते. यावेळी आ.विद्याताई चव्हाण, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, स्वातंत्र्य सैनिक निवृत्ती बाबर, विराज शिंदे, डॉ.नितीन सावंत, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष सचिन मोहिते, प्रसाद सुर्वे, रमेश धायगुडे, सरफराज बागवान यांच्यासह इंडिया आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
खा.अमोल कोल्हे म्हणाले, सातारा ही क्रांतीची भूमी असल्याने येथे निष्ठावंतांना जागा आहे. सातारचा स्वाभिमान व पवारांवरील प्रेम या निवडणुकीत दाखवून द्यायचे आहे. गद्दारी महाराष्ट्राच्या मातीतील नाही. जे पक्ष सोडून गेले त्यांच्याबद्दल जनतेच्या मनामध्ये फार मोठी चिड आहे. भाजप सरकारने खोटी आश्वासन देऊन लोकांचा विश्वासघात केला आहे. सैन्यदलात अग्नीवीर काढून तरुणांचे स्वप्न भंग केले. तर कंपनी व नोकऱ्यांचे खाजगीकरण करून देशातील बेरोजगारी वाढविली.असे सांगून ते म्हणाले,येत्या निवडणुकीत साताराचा स्वाभिमान हा दाखवून द्या. योद्धा जेव्हा शरण जात नाही, तेव्हा त्याला घेरण्याचा व बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो. आणि अशाच शशिकांत शिंदे या योद्धाला घेरण्याचा प्रयत्न होतोय. पण त्या योध्याने निष्ठा दाखवून लढण्याची तयारी दाखवली आहे. अशावेळी त्यांच्या पाठीशी उभे राहणे हे आपले कर्तव्य आहे. तेव्हाच तुम्ही जिंकता असे सांगून कोल्हे यांनी छत्रपती शंभुराजे यांच्या अटकेच्यावेळी अनाजीपंथांनी केलेल्या कारस्थानाची आठवण करून देत सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या निष्ठेबद्दल दाखले दिले.
ते पुढे म्हणाले, कॉलर उडवल्यानंतर आनंद वाटला पाहीजे, याबद्दल कोणाचेही दुमत असण्याचे कारण नाही. परंतु लोकसभेच्या निवडणुकीचा विचार करत असताना सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाला हमीभाव, तरुणांना रोजगार व महीलांना महागाईपासून दिलासा देऊन कॉलर उडवली पाहिजे. याचे भान ठेवून ही स्वाभिमानाची लढाई जनतेने हातात घेतली आहे. त्यामुळे पवारांच्या निष्ठावंत शिलेदाराला लोकसभेत पाठवून साताऱ्याचा स्वाभिमान जागृत करण्याचा निर्धार येथील मतदारांनी केला आहे.
आ.शशिकांत शिंदे म्हणाले, छत्रपती विरुद्ध लढताना राजा शंभूराजे हे माझ्याबरोबर असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. आमच्याकडे सैन्य आहेत व त्याबरोबर राजेही आले आहेत. नेत्याचा आदेश आणि जनतेसाठी लढणारा नेता म्हणून पवार साहेबांनी मला संधी दिली आहे. काही लोक पैसा, पद व दबावाखाली गेले. परंतु आम्ही निष्ठावंत असल्याने शरद पवारांच्या पाठीशी राहिलो. म्हणूनच आम्हाला मतदारांनी डोक्यावर घेतले आहे. कधीही सभागृहात न जाणारे, मतदारांना न भेटणारे खासदार आपण पाहिले आहेत. परंतु माझ्यासारखा तगडा उमेदवार उभा राहिल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे त्यांनी रडीचा डाव सुरू केला आहे. परंतु सातारची जनता ही स्वाभिमानी व शरद पवार प्रेमी असल्याने मतदार इतिहास घडवल्याशिवाय राहणार नाही. राज्यात अनेक जिल्हे विकसित झाले पण आमच्या जिल्ह्याचे शहरीकरण कुठेच दिसत नाही. त्यासाठी विकासाचे व्हिजन असावे लागते.
आ. विद्याताई चव्हाण म्हणाल्या, छत्रपतींनी कधीही दिल्ली समोर मान झुकवली नाही. परंतु येथील वारसदारांनी दिल्ली पुढे मान झुकवली आहे. कष्ट व हिमतीवर शरद पवारांनी पक्ष उभा केला. त्यांचे पक्ष फोडणाऱ्यांवर जनतेत प्रचंड चिड आहे. अशा लोकांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे. मोदी सरकार घालवले तरच देशावरील येणारे संकट दूर होणार आहे. गुजरातच्या दलालांना हटवले नाही तर हा देश विकला जाणार आहे.
याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष सचिन मोहिते, वाई पंचायत समितीचे उपसभापती अनिल जगताप, डॉ.नितीन सावंत, विराज शिंदे, पै. विलास देशमुख, विजयसिंह पिसाळ, अजित शेवाळे, प्रताप देशमुख, सुधाकर गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक दिलीप बाबर यांनी केले. सूत्रसंचालन संतोष बाबर यांनी केले.आभार प्रसाद सुर्वे यांनी मानले.
दरम्यान करहर येथील सभेत खा.अमोल कोल्हे यांनी स्वाभिमान व निष्ठेची आग असलेल्या शशिकांत शिंदे यांना निवडून देण्याचे आवाहन करीत ही निवडणूक एका व्यक्तीची,घराण्याची नाही. सर्वसामान्य जनतेची आहे. सर्वसामान्य माणूस स्वाभिमानी लोकांच्या गर्दीत उभा राहत असून शिंदे यांचे नेतृत्व बळकट करा. असे सांगितले .
आ. शशिकांत शिंदे म्हणाले, या तालुक्यातून नेतृत्व करताना तेथील जनतेने मला नितांत प्रेम दिले. संधी मिळाल्यावर त्याचे मी सोने केले. डोंगरदर्यातील लोकांना मी नेहमीच न्याय देण्याचे काम केले आहे. विकासाबरोबर येथील लोकांना हक्काचा माणूस मिळाला. मी स्वाभिमान वाढविला त्यामुळेच येथील मातीशी व भावनिकता वाढली आहे.मी येथील जनतेची कधीही नाळ तोडली नाही. माझ्या उमेदवारीने जावलीच्या सुपुत्राला मोठी संधी मिळाली आहे. या संधीचे सर्वांनी एकत्र येऊन सोने करावे, असे आवाहन आ.शिंदे यांनी केले.
यावेळी माजी आ.सदाशिव सपकाळ, माजी जि प सदस्य दीपक पवार, माजी सभापती सुहास गिरी, एस.एस.पार्टे, विठ्ठलराव गोळे, बुवासाहेब पिसाळ, विश्वनाथ धनावडे, जगन्नाथ शिंदे, सुरज गोळे, संतोष चव्हाण, शिवाजीराव देशमुख उपस्थित होते.
You must be logged in to post a comment.