सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा जिल्हा आणि परिसरात मुसळधार पावसामुळे अभूतपुर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. अतिवृष्टीमुळे महाबळेश्वर, वाई, जावळी व पाटण तालुके प्रभावित झाले असून नद्यांना पूर आले आहेत. पाटण तालुक्यातील आंबेघर, मिरगाव, हुंबर्ली तसेच जावळी तालुक्यातील देवरूखवाडी, रेंगडी, जोर याठिकाणी काहीजण दगावले आहे. खासदार श्रीनिवास पाटील यांनी वाई, महाबळेश्वर तालुक्यातील नुकसानग्रस्त गावांना भेट देऊन अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. तसेच ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांना धीर दिला.
तसेच प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून अतिवृष्टीमुळे सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यात झालेल्या जीवित हानी व मालमत्तेच्या नुकसानीचा आढावा घेतला. यावेळी आमदार मकरंद पाटील, प्रांताधिकारी श्रीमती संगीता राजापूरकर, तहसीलदार सुषमा चौधरी, श्री. बाळासाहेब भिलारे, श्री राजू शेठ राजापूरे, श्री प्रविण भिलारे, श्री किसन शिंदे, महाबळेश्वर नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष श्री अफजल सुतार, श्री संदीप साळुंखे, गट विकास अधिकारी श्री घोलप तसेच महसूल विभाग, नगरपालिका, जिल्हा परिषद, पोलीस, कृषी, आरोग्य, पाणीपुरवठा, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वित्त व जीवित हानी झाली आहे. महाबळेश्वर तालुक्यातील बरेच रस्ते व पूल वाहून गेल्याने अनेक गावे संपर्कहीन झाली आहेत. रस्ते दुरुस्त करावे व गावांशी लवकर संपर्क साधावा, लोकांपर्यंत पोहचावे, वीजपुरवठा तातडीने सुरूळीत करावा, आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्या, रेशनिंग व्यवस्था सुरळीत कराव्या अशा सूचना खासदार पाटील यांनी यावेळी प्रशासनातील अधिकारी वर्गाला केल्या. जिल्ह्यातील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. पंचनामे लवकर पूर्ण करून त्याचा अहवाल सादर करावा. जेणेकरून केंद्र शासनाकडून व राज्य शासनाकडून मदत मिळावी यासाठी प्रयत्न करता येईल. अधिकारी वर्गाने स्टेशन वर मुक्कामी थांबून या कठीण समयी लोकांना मदत करावी.
You must be logged in to post a comment.