खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी जनतेकडे दुर्लक्ष केले

उदयनराजे भोसले यांची ढेबेवाडी येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात टीका

ढेबेवाडी,(भूमिशिल्प वृत्तसेवा): काँग्रेसच्या नेत्यांनी निवडणुकांमध्ये जनतेला भरघोस आश्वासने देऊन खोऱ्याने मते मिळवली परंतु जनतेकडे साफ दुर्लक्ष केले, अशी टीका महायुतीचे लोकसभा उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांनी केली. तसेच देशाची उन्नती साधणाऱ्या भाजप सरकारला सत्ता देण्याचे आवाहन देखील त्यांनी केले.

ढेबेवाडी तालुका पाटण येथे आयोजित केलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई,भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड.भरत पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रमेश पाटील, रणजीत पाटील, डॉ. दिलीप चव्हाण, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष जयवंतराव शेलार, पंजाबराव देसाई ,सीमा मोरे, कविता कचरे,गणेश यादव राजेंद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.

खासदार उदयनराजे म्हणाले, कृष्णा खोरे विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणी मी केली होती. त्यानुसार हे महामंडळ स्थापन झाले. सध्या आपल्या भागात मराठवाडी धरण दिसते ते याच कृष्णा खोरे महामंडळाच्या माध्यमातून झालेले आहे. काँग्रेसच्या नेत्यांकडे अनेक वर्षे ही सत्ता होती तर मग अशी कामे त्यांनी का मार्गी लावले नाहीत, हा जाब जनतेने नेत्यांना विचारायला हवा.

पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले,महायुतीचे सरकार पुन्हा सुट्टीवर यावं यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत आहेत.त्यांनी माझ्याकडे साताऱ्यासह राज्यातील सहा लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी दिली आहे. पाटण विधानसभा मतदारसंघातून उदयनराजेंना मोठे लीड देण्याचा शब्द मी मुख्यमंत्र्यांना दिला आहे.तो शब्द ढेबेवाडी खोऱ्यातील जनतेने पाळावा.
निष्ठावंत कार्यकर्ते पैशाला भूलत नाहीत.

देसाई कुटुंबाच्या चौथ्या पिढीवर निष्ठेने प्रेम करणारी पाटण भागातील ही जनता आहे. विरोधकांनी पोत्याने पैसा समोर टाकला तरी त्याला भूलणारी ही जनता नाही, ही जनता माझ्यासह उदयनराजेंच्या पाठीशी राहणार आहे असे उद्गार शंभूराजे देसाई यांनी काढले.

रमेश पाटील यांच्या कार्यालयात सत्कार

माथाडी कामगार नेते स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांचे चिरंजीव ॲड. रमेश पाटील यांनी त्यांच्या ढेबेवाडी येथील कार्यालयात खासदार उदयनराजे भोसले यांचा सत्कार केला. याप्रसंगी ॲड. भरत पाटील, कविता कचरे आदींची उपस्थिती होती.

error: Content is protected !!