खासदार उदयनराजेंनी घेतली राजेंद्र चोरगे यांची भेट

पाठिंब्यासाठी नव्हे तर ही भेट मतदार म्हणून असल्याची राजेंद्र चोरगे यांची माहिती

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा) : येथील सामाजिक कार्यकर्ते, बांधकाम व्यावसायिक व बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक राजेंद्र चोरगे यांची महायुतीचे लोकसभा उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांनी भेट घेतली.यावेळी चोरगे यांनी उदयनराजेंचा सत्कार केला. तसेच निवडणुकीसाठी त्यांना शुभेच्छा देखील दिल्या.

साताऱ्यातील श्री.बालाजी सहकारी पतसंस्थेत हा सत्कार सोहळा झाला. यावेळी पतसंस्थेचे चेअरमन जगदीश खंडेलवाल, जयदीप शिंदे, हरिदास साळुंखे, संजय कदम, नितीन माने, उदय गुजर यांच्यासह पतसंस्थेचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी राजेंद्र चोरगे यांनी मतदानादिवशी मोठ्या संख्येने मतदारांना मतदानासाठी प्रेरित करूया, असे सांगितले. तसेच उदयनराजेंना लोकसभा निवडणुकीच्या बालाजी परिवारातर्फे शुभेच्छा दिल्या.

दरम्यान राजेंद्र चोरगे यांच्याशी चर्चा झाली असता, एक मतदार म्हणून महाराज मला भेटण्यास आले होते. आपण या निवडणुकीत कोणतीही राजकीय भूमिका घेतली नसली तरी या सदिच्छा भेटीत निवडणुकीच्या संदर्भाने खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्याशी चर्चा झाली. पाठिंब्यासंदर्भात कोणतीही चर्चा झाली नाही. यावेळी त्यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या, त्या व्यतिरिक्त काहीही नाही असे श्री चोरगे यांनी ‘भूमिशिल्प’शी बोलताना स्पष्ट केले.

श्री. चोरगे यांनी २०१४ मध्ये आम आदमी पार्टी तर्फे सातारा लोकसभेची निवडणूक लढवली होती. तसेच २००९ मध्ये सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीतही त्यांनी स्वतःच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र पॅनल उतरवले होते. साताऱ्याच्या राजकीय वर्तुळात उदयनराजे यांचे विरोधक व उपमुख्यमंत्री अजितदादांचे समर्थक अशीही त्यांची प्रतिमा आहे. या पार्श्वभूमीवर आजच्या या सदिच्छा भेटीमुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

error: Content is protected !!