जिल्ह्यातील उड्डाणपुलांसाठी उदयनराजेंचा गडकरींकडे पाठपुरावा

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची दिल्लीत घेतली भेट

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा): उंब्रज येथुन जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील सध्याच्या भराव पुलाऐवजी भागनिहाय पारदर्शी पुल उभारावा, तसेच खंडाळा- शिरवळ या दोन्ही ठिकाणी सेवा रस्त्यांच्या रुंदीकरणासह नवीन फ्लायओव्हर बनविणेत यावा, तसेच या ठिकाणी सेवा रस्त्यावर ड्रॉप ॲन्ड पिकअप पॉईट करावा.नागठाणे येथे फ्लायओव्हरच्याखाली प्रस्तावित असणारा अंडरपास मोठा करावा, वाहतुक आणि नागरिकांच्या दृष्टीने अतिआवश्यक असलेल्या या कामांना सर्वोच्च प्राधान्य देत कार्यवाही करावी, अशी मागणी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय परिवहन व रस्ते वाहतूक मंत्री ना. नितिन गडकरी यांचेकडे केली.

केंद्रीय परिवहन व रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या नवी दिल्ली येथील निवासस्थानी खासदार उदयनराजे भोसले यांनी भेट घेत, त्यांच्याशी जिल्ह्यातील विविध रस्त्यांच्या कामासंदर्भात चर्चा केली.

याबाबत उदयनराजे भोसले यांनी प्रसिध्दीपत्राद्वारे कळविले आहे की, कराड तालुक्यातील उंब्रज हे राष्ट्रीय महामार्गावरील महत्वाचे गाव आहे.याठिकाणी दोन राज्य महामार्ग, राष्ट्रीय महामार्गास छेदत असून, जिल्ह्यातील झपाट्याने विकसित उंब्रज हे महत्त्वाचे गाव आहे. कृष्णा, तारळी व मांड या नद्यांचा त्रिवेणी संगमही येथेच आहे. साधारण ४५ हजार लोकसंख्या असणाऱ्या उंब्रज मध्ये सुमारे २० वर्षापुर्वी भराव पद्धतीचा फ्लायओव्हर ब‍नविला आहे. त्यामुळे उंब्रजमधील ग्रामस्थांच्या व्यवसायांवर त्याचा विपरित परिणाम झाला आहे. उंब्रज ग्रामस्थांनी आमच्याकडे वेळोवेळी भराव पद्धतीचा फ्लायओव्हर ऐवजी सेगमेंट अर्थात पारदर्शक पुल करण्यासंबंधी मागणी केली होती.

याशिवाय नागठाणे येथे फ्लायओव्हरबरोबर मोठा अंडरपास बांधण्याबाबत मागणी केली आहे. नागठाणे हेदेखील व्यापारीपेठ म्हणून नावारुपाला आलेले महत्त्वाचे गाव आहे. नागठाणे पंचक्रोशीसह पाडळी, निनाम अश्या मोठ्या लोकसंख्येच्या गावांचा राष्ट्रीय महामार्गाशी दररोज संबंध येत असतो. त्यामुळे नागरीकांची गरज आणि समाजाचे हित लक्षात घेवून ही कामे मार्गी लावावीत तसेच साताऱ्याकडून पुण्याला जाताना, पारगांव- खंडाळा आणि शिरवळ या ठिकाणी असणारे सेवारस्ते रुंद करणे आवश्यक आहे. येथील एमआयडीसी- पंढरपूरकडे जाणाऱ्या वाहनांना मोठी कसरत करावी लागतेच, तथापी ते जास्त गैरसोयीचे ठरत आहे. त्यामुळे याठिकाणी नवीन फ्लायओव्हर करावा.या ठिकाणी आत्ताच्या सेवा रस्त्यांचे नियमानुसार रुंदीकरण करण्यात येवून, पारगांव – खंडाळा आणि शिरवळ येथे ड्रॉप ॲन्ड पिकअप पॉईट शेडसह निर्माण करावेत, जेणेकरुन वळणाऱ्या वाहतुकीला सोयीचे होवून महामार्गावरील वाहतुकीलाही कोणताही अडथळा न होता, वाहनधारकांची मोठी सोय होईल. म्हणूनच ही प्रस्तावित केलेली कामे हाती घेण्यात यावीत, अशी मागणी ही खासदार उदयनराजे भोसले यांनी ना. गडकरी यांच्याकडे केल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

केंद्रातील हेवीवेट मंत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि श्री. छ. उदयनराजे भोसले यांचेशी घनिष्ठ संबंध असणाऱ्या ना. नितीन गडकरी यांनी जागेवरच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी रजनीश कपूर यांना बोलावले आणि उंब्रज येथे सुरु असलेल्या कामातून उंब्रज येथील पारदर्शी नवीन पूल उभारण्याबाबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. तसेच याकरीता लागणारा निधी मंजूर करण्याचे अभिवचन खासदार उदयनराजे भोसले यांना त्यांनी दिले. त्याचप्रमाणे पारगांव-खंडाळा , शिरवळ येथील फ्लायओव्हर, सेवा रस्ता, पिकअप आणि ड्रॉप पाईट तसेच नागठाणे येथील अंडरपास बाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अंशू मलिक, श्रीवास्तव, पुणे व कोल्हापूर येथील महामार्गाचे प्रकल्प संचालक संजय कदम व वसंत पंधारकर यांचे समवेत विशेष बैठक घेवून सदरचे प्रश्न मार्गी लावले जातील असेही ना. नितिन गडकरी यांनी आश्वासित केले.

यावेळी ना. गडकरी यांचे सहाय्यक दीपक शिंदे, अमोल बिराजदार यांचेसह काका धुमाळ, ॲड. विनित पाटील, दिल्लीतील स्वीय सहाय्यक करण यादव उपस्थित होते.

error: Content is protected !!