गुळुंब ग्रामपंचायतीने रोखले ‘मुलगी झाली हो’ मालिकेचे चित्रीकरण

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : वाई तालुक्यात गुळूंब गावामध्ये ‘मुलगी झाली हो’ या मालिकेचे सुरू असलेले चित्रीकरण बंद करण्यास ग्रामपंचायतीने नोटीस काढले आहे. स्टार प्रवाह या मराठी वाहिनीवरील या कार्यक्रमात विलास पाटील यांची भूमिका साकारणारे अभिनेते किरण माने यांना मालिकेच्या निर्मात्यांनी या कार्यक्रमातून काढून टाकल्याच्या निषेधार्थ गुळुंब ग्रामपंचायतीने या मालिकेच्या निर्मात्यांना पत्राद्वारे गावातील चित्रीकरण बंद करण्यास कळविले आहे.

किरण माने यांना राजकीय दबावातून मालिकेतून वगळले त्यामुळे कलाकारांवर अन्याय होत असल्याचा आक्षेप येथील ग्रामस्थांनी घेतला आहे.
किरण माने यांचेवर झालेल्या अन्यायाचे संपूर्ण राज्यात पडसाद उमटत आहेत. याच पार्श्वभूमीवर गुळुंब ग्रामपंचायतीने नोटीस बजावून पॅनोरमा एंटरटेनमेंट प्रा. लि. या संस्थेला १५ जानेवारी २०२२ पासून गुळुंब ग्रामपंचायतीच्या हद्दीत मालिकेचे चित्रीकरण करण्यास दिलेली परवानगी रद्द करून चित्रीकरण थांबवण्यास सूचना केली आहे. राजकीय भूमिका मांडणाऱ्या एका मराठी कलावंताला घटनेने दिलेल्या अधिकाराचा वापर केला म्हणून मालिकेतून काढून टाकणं हे घटनेविरोधी आहे, असे मत गुळुंब ग्रामपंचायतीच्या सरपंच स्वाती माने यांनी व्यक्त केले आहे. 

अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेच्या संपूर्ण टीमने महाराष्ट्रात शिवशंभू, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारी लोकशाही नांदते, हे विसरू नये, असा सल्ला देखील या पत्राद्वारे देण्यात आला आहे. तसेच, मनुवादी विचारसरणीच्या स्टार प्रवाह वहिनी व ‘मुलगी झाली हो’ या मालिकेच्या गुळुंब गावात होत असलेल्या चित्रीकरणासाठी गुळुंब ग्रामपंचायत मान्यता नाकारत असून अशा प्रवृत्तीला इथून पुढे आमच्या गुळुंब गावच्या हद्दीत प्रवेश नाही, अशीही स्पष्टोक्ती सरपंच स्वाती माने यांनी केली आहे.

error: Content is protected !!