चाफळमध्ये एकतर्फी प्रेमातून भरदिवसा युवतीचा गळा चिरून खून

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) एकतर्फी प्रेमातून प्रियकराने भरदिवसा घरात घुसून युवतीवर चाकूहल्ला करून तिचा निर्घृण खून केला. गुरुवारी ी(दि. २३) सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास चाफळ (ता. पाटण) येथे ही घटना घडली. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.

दरम्यान पोलिसांनी संशयित युवकाला ताब्यात घेतले आहे. चैतन्या बाळू बंडलकर (वय १७, मूळ गाव वाठार किरोली, सध्या राहणार चाफळ) असे खून झालेल्या मुलीचे नाव आहे. अनिकेत मोरे (वय २०, रा. शिरंबे, कोरेगाव) असे खून केलेल्या युवकाचे नाव आहे. खून केल्यानंतर आरोपी अनिकेतने स्वत: मल्हारपेठ पोलीस ठाण्यात हजर राहून खुनाची कबुली दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, चाहुरवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेवर कार्यरत असलेल्या शिक्षिका नंदा पाटोळे-बंडलकर या आपल्या दोन मुलींसह चाफळ येथे वास्तव्यास आहेत. तर मयत चैतन्याचे वडील हे शेतकरी असून ते गावी वाठार किरोलीला शेती करतात. त्यामुळे नंदा या दोन मुलींसोबत चाफळ येथील सोमनाथ पोतदार यांच्या घरामध्ये भाडोत्री म्हणून राहतात. चैतन्याला एक तीन वर्षांची छोटी बहीण आहे. गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे नंदा या चाहुरवाडी येथे शाळेत गेल्या होत्या. वडील बाळू हे दोन दिवस चाफळलाच होते. तेही आज गुरुवारी सकाळी गावी किरोलीला निघून गेले होते. गुरुवारी चैतन्या ही घरात टीव्ही पाहत बसली होती. तर तिची लहान बहीण घराच्या बाहेर अंगणात खेळत होती. संशयित अनिकेतचे चैतन्यावर एकतर्फी प्रेम होते. त्यातून तो तिला भेटत होता. अनिकेतने काही दिवसांपूर्वीच चैतन्याच्या आईची भेट घेऊन लग्नासाठी मागणी केली होती. अनिकेत गुरुवारी दुचाकीवरून चाफळला आला होता. घरात कोणी नसल्याचे पाहून घरावर लक्ष ठेवून असलेल्या संशयित आरोपी अनिकेतने घरात घुसून काही समजण्याच्या आतच चैतन्याचा तोंड दाबून गळा चिरला. यात चैतन्याचा जागीच मृत्यू झाला. खून केल्यानंतर संशयित आरोपी अनिकेतने स्वत: मल्हारपेठ पोलीस ठाण्यात हजर राहत खुनाची कबुली दिल्यानंतर या घटनेचा उलगडा झाला.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच कराडचे पोलीस उपअधीक्षक रणजित पाटील, पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, ढेबेवाडी पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस निरीक्षक अजित पाटील, संतोष पवार आदींनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. या घटनेची नोंद मल्हारपेठ पोलीस ठाण्यात झाली असून, अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक उत्तम भापकर करत आहेत.

error: Content is protected !!