भावकीतील लोकांनी युवकाचा खून करून अपघाताचा केला बनाव बनाव

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : वाई तालुक्यातील अनवडी गावातील प्रशांत पवार या युवकाचा खून करून अपघाताचा बनाव केल्याप्रकरणी खंडाळा पोलिसांनी पारगाव येथील यादव भावकीतील पाच जाणांना ताब्यात घेतलं आहे.

वाई तालुक्यातील अनवडी गावातील प्रशांत पवार या युवकाचा अपघात झाल्याची घटना घडल्याची नोंद झाली होती. मात्र, पोलिसांना अपघाताची नोंद करताना संशय आल्याने अधिक माहिती घेतली असता शवविच्छेदन अहवालात काही वेगळंच निष्पन्न झालं. त्यामुळे पोलिसांनी वेगळ्या पद्धतीने तपासाला गती देत या घटनेतील संशयित आरोपी सचिन यादव, हणमंत यादव, अभिषेक यादव, विजय यादव, कुणाल यादव यांना ताब्यात घेतलं. पोलिसी खाक्या दाखवताच संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिली.

मागील पाच सहा दिवसांपासून हे आरोपी फरार होते. मुख्य म्हणजे सगळे आरोपी एकाच भावकीतील आहेत आणि ज्या युवकाचा खून झाला होता तो प्रशांत पवार हा त्यांचा नातेवाईक असल्याची माहिती पोलिस अधिक्षक अजयकुमार बन्सल यांनी पत्रकार परिषदेत दिली. १२ डिसेंबर रोजी आरोपींनी प्रशांत पवार,ओंकार पवार आणि त्याचे वडील प्रकाश पवार यांना शेतात नेऊन मारहाण केली होती. त्यात प्रशांत पवार याचा मृत्यू झाला होता. यावेळी ओंकार पवार आणि प्रकाश पवार हे देखील जखमी झाले होते. संशयितांनी सल्लामसलत करून प्रकाश पवार आणि ओंकार पवार यांना जीवे मारण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करत प्रशांत याचा मृत्यू अपघातात झाला आहे असं सांगण्यास भाग पाडलं. जीव वाचवण्यासाठी दोघांनी तशी तक्रार देण्यासाठी पोलीस ठाणं गाठलं. यावेळी तक्रार नोंद करत असताना खंडाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश इंगळे यांना या प्रकाराचा संशय आला. त्यांनी अधिक चौकशी करून तपास केल्यावर खरा प्रकार उघडकीस आला. सर्व आरोपींना खंडाळा कोर्टात हजर केल्यानंतर त्यांना ८ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली. अधिक तपासानंतर आणखी काही नावं पुढं आली असून आरोपींची संख्या आठ वर पोहोचली आहे.

error: Content is protected !!