सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : गंभीर स्वरूपाची मारहाण केल्याने विवाहितेचा मृत्यू झाल्याच्या फिर्यादीनुसार काल रात्री सातारा शहर पोलिस ठाण्यात खेड येथील गोवर्धनगर येथील चौघांवर खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याची फिर्याद अतुल दत्तात्रय धुमाळ (रा. पुणे) यांनी नोंदवली.
खेड येथील गोवर्धननगरमध्ये सुजाता शंकर भोळे (वय २४) या राहण्यास होत्या. २०१८ मध्ये त्यांचा विवाह झाला होता. मुलगी झाल्याच्या कारणावरून त्यांचा शंकर भोळे व इतरांनी छळ चालू केला. लॅब सुरू करण्यासाठी, तसेच इतर कारणासाठी माहेरहून ५ लाख आणावेत, यासाठी नंतर त्यांनी सुजाता यांना मारहाण करणे सुरू केले. ता. २० रोजी सकाळी शंकर भोळे यांनी सुजाता यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केल्याचे अतुल धुमाळ यांना फोनद्वारे सांगितले. यानंतर ते साताऱ्याकडे येण्यास निघाले. याचदरम्यान उपचारादरम्यान सुजाता यांचा मृत्यू झाला. या वेळी त्यांच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा होत्या. यानंतर सुजाता यांचे शवविच्छेदन पुणे येथे करण्यात आले.
मारहाणीमुळेच सुजाता यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करत याबाबतची फिर्याद अतुल धुमाळ यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात नोंदवली. यानुसार शंकर काळूराम भोळे, लीलाबाई काळूराम भोळे, राजेंद्र काळुराम भोळे, स्वाती राजेंद्र भोळे (सर्व रा. खेड) यांच्यावर खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याचा तपास पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर हे करीत आहेत.
You must be logged in to post a comment.