खोके संस्कृती, गद्दारी व मलिदा गॅंगच्या टक्केवारी विरोधासाठीच माझी उमेदवारी : सत्यजितसिंह पाटणकर

पाटण विधानसभा मतदार संघातून पाटणकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ

पाटण, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : पाटणमधील आपली अपक्ष उमेदवारी ही तालुक्याचा स्वाभिमान जपण्यासाठी ‘धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती’ अशी लढवत आहोत.खोके संस्कृतीला, गद्दारीला व मलिदा गॅंगच्या टक्केवारीला विरोध करण्यासाठी आम्ही निवडणुकीत उतरलो आहोत. सर्वसामान्य जनतेच्या ताकतीवर निश्चितपणे या आम्ही विजयी होऊ, असे स्पष्ट प्रतिपादन पाटण मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सत्यजितसिंह पाटणकर यांनी केले आहे.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचार प्रारंभानंतर माध्यमांशी बोलताना पाटणकर म्हणाले की, गेले दहा वर्षात पाटण तालुक्याचा विकास झाला, असे म्हणणे म्हणजे हास्यास्पदच बाब आहे. विकास कोणाचा व कोणासाठी झालाय, याबाबत भले मोठे प्रश्नचिन्ह आहे‌. कारण जर विकास झाला असेल तर, काही मंडळी खोट्या घोषणा कशासाठी करतात? बुरशी आलेले लाडू वाटायचं कारण काय आहे? गणेशोत्सवात दहा किलो साखरेच्या पिशव्या कशासाठी वाटण्यात आल्या? पेढ्याची पाकीटे फुकट वाटायचा उद्देश काय? आज बाजारपेठेमध्ये काही जणांचे फोटो असणाऱ्या वस्तूंच्या पिशव्या कशासाठी वाटल्या जात आहेत?, असे प्रतिप्रश्न श्री. पाटणकर यांनी उपस्थित करत विरोधकांच्या कार्यकाळात केवळ मलिदा गॅंगचाच विकास झाला आहे, हे जनतेला माहीत झाल्याने निश्चितपणे मतदार याचे उत्तर मतपत्रिकेतून देईल,असेही ते म्हणाले.

आपली उमेदवारी सर्वसामान्य जनतेचा स्वाभिमान जपण्यासाठी आहे. राजकारण व समाजकारणामध्ये आमचे सर्व कार्यकर्ते जीव ओतून काम करत आहेत. त्यांचा स्वाभिमान राखण्यासाठी व आमची अस्मिता जपण्यासाठी म्हणून आम्ही अपक्ष अर्ज भरलेला आहे आणि निश्चितपणे आम्ही यशस्वी होऊ, अशी खात्रीही यावेळी श्री. पाटणकर यांनी व्यक्त केली.

टक्केवारी आणि ठेकेदारीला वैतागलेली जनता आपल्या उमेदवारीमुळे आशा ठेवून आहे व जनतेमध्ये एक वेगळा विश्वास निर्माण झालेला आहे. पुन्हा एकदा पाटण विधानसभा मतदारसंघ हा विकासाच्या दृष्टीने आपल्याला सक्षम करायचा आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती व्हावी व शेतकरी, व्यापारी, नोकरदार, महिला, वृद्ध आदी विविध समाज घटकांच्यासाठी धोरणात्मक उपक्रम राबवून त्यांच्या विकासासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे सांगून आपले निवडणूक चिन्ह रिक्षा हे सर्वांचेच लोकप्रिय व आवडते वाहन तसेच सर्वसामान्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. परिसरामध्ये जर आपण पाहिलं तर, सर्वत्र आढळणाऱ्या ऑटो रिक्षासारखं दुसरं कोणतंही पॉप्युलर चिन्ह नाही, आणि आमचे सगळे कार्यकर्ते घराघरात जाऊन हे लोकप्रिय चिन्ह पोहचवण्याचं काम करत आहेत, असेही श्री. पाटणकर यावेळी बोलताना म्हणाले.

अपक्ष असल्याने सर्वांचाच आशीर्वाद

अपक्ष उमेदवारीसाठी तुम्हाला शरद पवारांचा आशीर्वाद आहे काय? या पत्रकारांच्या प्रश्नावर आम्ही अपक्ष असल्यामुळे आम्हाला सगळ्यांचाच आशीर्वाद आहे, असे मिश्किल उत्तर सत्यजितसिंह पाटणकर यांनी दिले.

error: Content is protected !!