नगरपंचायतीत अनेकांची ‘पंचायत’

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा) : आरक्षण सोडतीमध्ये इतर मागास प्रवर्ग (ओबीसी) आरक्षण काढताना २७ टक्क्यांची मर्यादा ओलांडली गेल्याने संपूर्ण राज्यासह सातारा जिल्ह्यातील पाच नंगरपंचायतींची आरक्षण सोडत रद्द करावी लागली. खंडाळा, कोरेगाव, वडूज, दहिवडी व पाटण या पाचही नगरपंचायतींसाठी प्रत्येकी १७ जागा असून एका प्रभागातून एक नगरसेवक नगरपंचायतीवर निवडूण जाणार आहे. महिलांना ५० टक्के आरक्षण असल्याने सर्वच नगरपंचायतीत ९ महिला तर आठ पुरूष निवडूण येणार आहेत. या आरक्षणामुळे नगरपंचायतीसाठी इच्छुक असलेल्या काहींचा अपेक्षाभंग झाला तर काही प्रभागात अपेक्षेप्रमाणे आरक्षण पडल्याने इच्छुुक गुडघ्याला बाशिंग बांधून तयार झाले होते; परंतु राज्य निवडणूक आयोगाकडून अचानक आरक्षण रद्द केल्याने अनेकांची पंचायत झाली.

सातारा जिल्ह्यातील खंडाळा, कोरेगाव, दहिवडी, वडूज व पाटण या नगरपंचायतींसाठी शुक्रवारी प्रभाग रचनेचा आराखडा व आरक्षण सोडत लकी ड्रॉ पद्धतीने पार पडली. राजकीय इच्छाशक्ती असलेल्या अनेकांचे मनसुबे या आरक्षणामुळे धुळीस मिळाले तर काहींच्या अपेक्षा पूर्ण झाल्या. आरक्षण जाहीर झाल्याने नगरपंचायतीसाठी राजकीय घडामोडींनी देखील वेग घेतला मात्र, काही तासांतच ‘कही खुशी.. कही गम’ असे चित्र निर्माण झाले.

इतर मागास प्रवर्गासाठी आरक्षण सोडतीनुसार प्रत्येक नगरपंचायतीमध्ये पाच जागा राखीव झाल्या होत्या. यामध्ये दोन पुरुष व तीन महिला यांना संधी मिळणार होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार इतर मागास प्रवर्गाचे आरक्षण २७ टक्क्यांच्यावर दिले जाऊ नये असे संकेत आहेत. प्रस्तावित आरक्षणानुसार इतर मागास प्रवर्गाचे आरक्षण २९.४१ टक्क्यांच्यावर गेल्याने आरक्षण सोडतच रद्द करण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने रात्री उशिरा घेण्यात आला. त्यामुळे आता प्रशासनाला पुन्हा नव्याने आरक्षण सोडती काढण्यासाठी मोठा उपद्वयाप करावा लागणार आहे. ओबीसींची संख्या कमी झाल्याने आता खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना संधी मिळणार असल्याने त्यांचे चेहरे खुलले आहेत.

error: Content is protected !!