नानक साई फाऊंडेशनची ११ वी संत नामदेव घुमान यात्रा

ऑक्टोबरमध्ये पंजाब–दिल्ली–शिमला दौरा; भक्ती, संस्कृती आणि पर्यटनाचा संगम

भुईंज, (महेंद्रआबा जाधव) : महाराष्ट्रातील भाविकांना अध्यात्म, पर्यटन, इतिहास आणि संस्कृतीचा अद्वितीय संगम अनुभवण्याची संधी देणारी ११ वी संत नामदेव घुमान यात्रा यंदा ऑक्टोबर महिन्यात आयोजित करण्यात आली आहे. नानक साई फाऊंडेशनचे अध्यक्ष पंढरीनाथ बोकारे यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा नांदेड ते अमृतसर मार्गे पार पडणार असून, मागील दहा यात्रांप्रमाणे यंदाही यात्रेचा उत्साह ओसंडून वाहणार आहे.

यात्रेची वैशिष्ट्ये

  • संत नामदेव महाराजांच्या पवित्र कर्मभूमी घुमान (पंजाब) येथे नतमस्तक होणे.
  • सुवर्ण मंदिर (अमृतसर), वाघा बॉर्डर, जालियनवाला बाग, आनंदपूर साहिब, फतेहगड साहिब, कुरुक्षेत्र, पानिपत आदी ऐतिहासिक व धार्मिक स्थळांना भेट.
  • शिमला, चंदिगड, भटिंडा, नैना देवी शक्तीपीठ, भाक्रा नांगल धरण यांसारख्या निसर्गरम्य स्थळांचा समावेश.
  • पंजाबच्या पर्जिया कलान गावात मुक्काम ठेवून तेथील संस्कृती व पाहुणचाराचा प्रत्यक्ष अनुभव.

दरम्यान, यंदाच्या यात्रेत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंतसिंह मान यांच्या वतीने त्यांच्या मातोश्री श्रीमती हरपाल कौर मान यात्रेचे संग्रुर येथे स्वागत करणार आहेत.

श्रद्धा आणि संस्कृतीचा मेळावा

ही सद्भावना यात्रा केवळ धार्मिक दर्शनापुरती मर्यादित नसून भक्ती, इतिहास, कला, संस्कृती आणि मनोरंजन यांचा संगम घडवणारी आहे. त्यामुळे कुटुंबासह पर्यटनासाठी योग्य अशी ही यात्रा दरवर्षी शेकडो भाविकांना अविस्मरणीय अनुभव देत आहे. दरवर्षीप्रमाणे या वर्षीदेखील सुमारे २४८ भाविक यात्रेत सहभागी होणार आहेत. आतापर्यंत झालेल्या दहा यात्रांमधून चार हजारांहून अधिक मराठी भाविकांना पंजाब–हरियाणातील धार्मिक व ऐतिहासिक स्थळांचे तसेच संत नामदेव महाराजांच्या कर्मभूमीचे दर्शन घडवण्यात फाऊंडेशन यशस्वी झाले आहे.

भक्ती, संस्कृती, राष्ट्रभक्ती आणि निसर्गसौंदर्याचा संगम अनुभवण्यासाठी इच्छुक भाविकांनी या यात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक समितीने (९८२३२६००७३) केले आहे.

error: Content is protected !!