सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा : सातारा पालिकेच्यावतीने दिला जाणारा डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती सामाजिक पुरस्कार प्रसिध्द अभिनेते नाना पाटेकर आणि मकंरद अनासपूरे यांच्या ‘नाम फौंडेशन’ तसेच प्रसिध्द उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, ‘भारत फोर्ज’चे सर्वेसर्वा बाबासाहेब निळकंठ कल्याणी यांना जाहीर करण्यात आला आहे. एक लाख रुपये रोख, मानपत्र, स्मृतीचिन्ह, शाल असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
दरम्यान, हे पुरस्कार दोन वर्षांचे असून कोरोना महामारीमुळे त्याचे वितरण करण्यात आले नव्हते. लवकरच या पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या उपस्थितीत एका दिमाखदार सोहळ्यात करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेचे उपाध्यक्ष मनोज शेंडे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.
सातारा नगरपालिकेकडून गेल्या आठ वर्षांपासून ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती सामाजिक पुरस्कार’ देण्यात येत आहे. मात्र, कोरोना महामारीमुळे या पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमास विलंब झाला होता. सातारा विकास आघाडीचे अध्यक्ष खासदार उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, मुख्याधिकारी अभिजित बापट, अतिरिक्त मुख्याधिकारी पराग कोडगुले, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी पुरस्काराच्या निवड समितीचे सदस्य म्हणून काम पाहिले आहे.
सातारा विकास आघाडीच्या सत्तेचा पाच वर्षांचा कार्यकाल आज (रविवार, ता. २६) पूर्ण होत आहे. त्या पार्श्वभूमीवर पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. शासनाच्या नियमानूसार ज्यांच्याकडे पालिकेचा कारभार जाईल ते आणि मुख्याधिकारी, पुरस्कार निवड समिती सदस्य पुरस्कार वितरणाचे नियोजन करणार आहेत अशी माहिती उपनगराध्यक्ष शेंडे यांनी दिली.
‘डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती सामाजिक पुरस्कार’ जाहीर झालेले बाबासाहेब कल्याणी हे ‘भारत फोर्ज’चे प्रमुख असून ते मुळचे कराड तालुक्यातील कोळे येथील आहेत. भारत फोर्जच्या सामाजिक बांधिलकी कार्यक्रमांतर्गत सातारा जिल्ह्यातील कोरेगाव, माण आणि खटाव या तालुक्यातील अठ्ठावीस गावांमध्ये पाणी, आरोग्य, शिक्षण, वैयक्तिक उत्पन्नवाढ, अंतर्गत रस्ते या निर्देशांकावरती गेली पाच वर्षे साताऱ्यात प्रभावीपणे कार्य केले आहेे. या माध्यामतून ६५ हजारांपेक्षा जास्त लोकांना लाभ झाला आहे. सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या अण्णासाहेब कल्याणी हायस्कूलला त्यांनी स्वत:ची जमीन दिली आहे. यामुळे समाजातील वंचित घटकातील अनेक मुलांना येथे शिक्षण घेता आले. सातारा पालिकेच्या प्रशासकीय इमारतीसाठी त्यांनी स्वत:ची जमीन अवघ्या एक रुपया किंमतीत दिली आहे.
डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती सामाजिक पुरस्कार’ निवड समितीने पहिल्यांदाच या पुरस्कारासाठी कोणत्यातरी सामाजिक संस्थेची निवड केली आहे. पुरस्कारप्राप्त ‘नाम फौंडेशन’ हे प्रख्यात अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपूरे यांनी २०१५ मध्ये स्थापन केली. विदर्भ, मराठवाड्यात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना या दोघांकडून वैयक्तिक पातळीवर आर्थिक मदत केली. नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २०१५ या वर्षी आत्महत्या केलेल्या २३० शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत तसेच अन्य साहित्याचेही वाटप केले. आजअखेर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ‘नाम फौंडेशन’कडून अविरतपणे समाजकार्य सुरु आहे.
You must be logged in to post a comment.