नरेंद्र पाटील यांच्यावरील हल्ल्यामागे बन्या, मन्या

शिवसेना स्टाईलने उत्तर देणार असल्याचा जिल्हाप्रमुखांचा इशारा
सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा) :शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख नरेंद्र पाटील यांच्यावर झालेला भ्याड हल्ला पूर्वनियोजित असून या मागील खरे सूत्रधार हे बन्या, मन्या आहेत. त्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे आगामी काळात शिवसेना स्टाईलने धसास लावली जातील, असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे. 

निवेदनात म्हटल्याानुसार, सातारा पालिकेतील भ्रष्टाचार उघड होऊ नये म्हणून हा हल्ला घडवून आणला गेला असून नरेंद्र पाटील यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्यास आणि त्यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या खोट्या केसेसना शिवसेना मुळीच घाबरत नाही. गुन्हे दाखल करताना पोलिसांकडून कोणत्याही प्रकारची खातरजमा करण्यात आली नाही परंतु भविष्यात अशा कितीही केसेस दाखल झाल्या तरी शिवसेनेची भ्रष्टाचाराविरुद्धची लढाई अजिबात थांबणार नाही. या प्रकरणातील हल्लेखोर हे निव्वळ पुढे केले गेलेले मोहरे असून खरे सूत्रधार तर बन्या, मन्या आहेत. बायोमायनिंग आरोग्य विभागातील कचरा टेंडर, ’निसर्ग’ला दिलेले बागेचे ठेके, दलित वस्तीच्या कामातील टेंडर घोटाळा अशी त्यांची एक ना अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे आगामी काळात शिवसेनेच्या वतीने धसास लावली जातील, असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
याप्रसंगी गरज भासल्यास विधिमंडळात आवाज उठवला जाईल तसेच पालिकेतील भ्रष्टाचारी कारभाराविरोधात येत्या स्वातंत्र्यदिनी ध्वजवंदनानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा शिवसेनेच्या वतीने बोंबाबोंब आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
error: Content is protected !!