सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : पुणे-बेंगलोर महामार्गावरील शेंद्रे ते कागल दरम्यानच्या सहापदरीकरण कामाचे नियोजन अंतिम टप्प्यात आले असून हे काम सुरू करण्यापूर्वी सर्किट हाऊस, कोल्हापूर येथे आज आढावा बैठक संपन्न झाली. केंद्रीय वाहतूक मंत्री मा.नितीन गडकरी यांनी केलेल्या सूचनेनुसार कोल्हापूरचे पालकमंत्री ना.सतेज पाटील यांनी या बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत खासदार श्रीनिवास पाटील व खासदार उदयनराजे भोसले यांनी विविध मुद्द्यावर सविस्तर चर्चा करून आवश्यक त्या सूचना यावेळी केल्या.
याप्रसंगी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.सतेज पाटील, आपल्या सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.बाळासाहेब पाटील, ग्रामविकास मंत्री ना.हसन मुश्रीफ, माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण, कोल्हापूरचे खासदार संजय मंडलीक, हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने, राज्यसभेचे खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती, आ.राजू बाबा आवळे, आ.मानसिंगराव नाईक, आ.अरूण लाड, राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण विभागाचे प्रमुख श्री.श्रीवास्तव, प्रकल्प संचालक श्री.पंदरकर, श्री.सारंग पाटील यांच्यासह सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते.
यामध्ये उंब्रज येथे नियमित होणाऱ्या वाहतूक कोंडी बाबत लक्ष वेधून येथील अंडरपास पूल योग्य नसल्याने मार्गाचे पुनर्नियोजन करण्यात यावे. तसेच या ठिकाणाहून कोकणाकडे जाणारा उंब्रज ते चिपळूण आणि पंढरपूरकडे जाणारा राज्यमार्ग असल्याने याठिकाणी मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. या समस्येतून नागरिकांची सुटका करण्यासाठी योग्य कार्यवाही करावी. पावसाळ्यात महामार्गावरील नारायणवाडी, मालखेड, पाचवड फाटा, गोटे, मुंढे व अन्य ठिकाणी पाणी साचत असते. हे पाणी साचल्याने परिसरातील स्थानिक शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. तर रस्त्यावर पाणी साचून राहिल्याने हा महामार्ग वाहतुकीसाठी धोकादायक बनतो. याबाबत सुधारणा करण्यात याव्यात अशी सूचना केली. याशिवाय महामार्गावर आवश्यक ठिकाणी पथदिव्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र हे पथदिवे कायम बंद स्थितीत असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे हे पथदिवे सुरू करण्याचीही व्यवस्था करण्यात यावी यासह अन्य सूचना यावेळी केल्या.
दरम्यान लोकसभेत खासदार पाटील यांनी सूचित केल्याप्रमाणे इंदोली फाटा व मसूर फाटा येथे फ्लायओवर ब्रीज बांधण्यात येणार असल्याबद्दल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे आभार मानले.
You must be logged in to post a comment.