सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) ः गॅस, डिझेल, पेट्रोल अशा सर्व इंधनाच्या दरात सातत्याने होत असलेल्या दरवाढीचा निषेध नोंदविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी लॉकडाउन आणि करोना संकटाचे भान राखत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.
‘जनता महागाईने ग्रस्त, पंतप्रधान महाल बनवण्यात व्यस्त’, ‘जनता करोनाने बेजार त्यात महागाईचा मार’, ‘करोनाने वाचलो आणि महागाईने मेलो’ असे फलक हाती धरत राष्ट्रवादी काँग्रेसकडून रस्त्यावर आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष सुनील माने, तेजस शिंदे, अतुल शिंदे, गोरख नलवडे, समिद्रा जाधव व कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या इंधन दरवाढीचा निषेध नोंदविला.
करोनाचा प्रंचड उद्रेक वाढत असताना केंद्र सरकार डोळ्यावर पट्टी बांधून महागाई नियंत्रणात आणण्याचे ढोंग करत आहे. केंद्राने सातत्याने गॅस, डिझेल, पेट्रोल दरवाढ दिवसागणिक वाढ सुरूच ठेवली आहे. यामुळे सर्वसामान्यांना महागाईचा फटका सहन करावा लागत आहे. यात गृहिणींचे महिन्याचे बजेट कोलमडले आहे तर हातावर पोट असणारा आधीच हाताला काम नसल्याने बेजार झाला आहे. नोकरदारांचे पगार घटले आहेत. अशा परिस्थितीमध्ये केंद्र सरकार सातत्याने इंधन दरवाढ करीत आहे. केंद्राच्या या धोरणाविरोधात जाहीर निषेध करण्यात आला.
You must be logged in to post a comment.