सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : किसन वीर सहकारी साखर कारखान्यावर ८८ ची कारवाई करण्याबाबत सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी आम्हाला विश्वास दिला आहे. कारखाना अडचणीत आणल्याप्रकरणी किसन वीरच्या अध्यक्षांसह संचालकांवर जबाबदारी फिक्स करून त्यांची मालमत्तेवर टाच आणणे गरजेचे आहे. सहकार मंत्र्यांनी आमच्या मागणीची दखल घेऊन कारवाई केली नाही तर आम्हाला भाजप नेते किरीट सोमय्यांकडे जावे लागेल, असे खळबळ जनक विधान राष्ट्रवादीचे नेते व जिल्हा बँकेचे संचालक नितीन पाटील यांनी केले आहे.
किसन वीर आबांनी उभी केलेली ही संस्था असून सहा तालुक्यातील शेतकरी कार्यकर्त्यांच्या घामातून ती उभी राहिली आहे. ही संस्था वाचली पाहिजे, असे सांगून नितीन पाटील म्हणाले, किसन वीर कारखाना दिवाळखोरीच्या उंबऱ्यावर उभा आहे. गेल्यावर्षी एकाही बँकेने कारखान्याला कर्ज दिलेले नाही. उलट महाविकास आघाडी सरकारने ३० कोटी ५८ लाखांची थकहमी कारखान्याला दिली. त्यातून कारखान्याने गळीत केले.गेल्यावर्षी केवळ चार लाख १६ हजार टन ऊसाचे गाळप झाले. त्यातून तीन लाख ७८ हजार पोती साखर निर्मिती होऊन कारखान्याला साखरेवर कोणीही कर्ज दिलेले नाही. यावर्षी या कारखान्याला थकहमी मिळाली नही तर १४ लाख टन ऊस उभा राहणार आहे, त्याला मदन भोसले व त्यांचे संचालक मंडळ जबाबदार असेल.
किसन वीर कारखान्यात झालेल्या घोटाळ्याबाबत आम्ही सहकार मंत्र्यांकडे तक्रार केलेली आहे. त्यानुसार ८८ अन्वये कारखान्याच्या अध्यक्षांसह संचालकांची चौकशी करून जबाबदारी फिक्स करावी. तसेच संचालकांच्या मालमत्तांवर जप्ती आणावी, अशी मागणी आम्ही केली आहे. त्यामुळे सहकार मंत्री बाळासाहेब पाटलांनी आमच्या मागणीची नोंद घेतली नाहीतर आम्हाला भाजपचे नेते किरीट सोमय्यांकडे जावे लागेल, असे स्पष्ट केले.
You must be logged in to post a comment.