महागाईच्या विरोधात आता राष्ट्रवादीही रस्त्यावर

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) – पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ आणि महागाईच्या विरोधात मागील काही दिवसांपासून काॅंग्रेस आक्रमक झाली असून राज्यभरात सायकल रॅली आणि स्वाक्षरी मोहिम सुरु असताना आता राष्ट्रवादीही महागाईच्या विरोधात रस्त्यावर उतरली आहे. आज खटाव तालुका राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या वतीने वडूज तहसील कार्यालयावर मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन दिले आहे.

या आंदोलनात आमदार शशिकांत शिंदे, जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे, संदीप मांडवे, यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजप सरकार विरोधात घोषणाबाजी करीत इंधन दरवाढीचा निषेध केला.

तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, देशात महागाईचा भडका उडाला असून वाढत्या महागाईने सर्वसामान्य नागरिकांना आपलं कुटुंब चालवणं अवघड झाले आहे. केंद्र सरकारच्या चुकीच्या आणि भांडवलदारांच्या हिताच्या धोरणामुळे इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. त्यात कोरोनाचे संकट असल्याने केंद्र सरकारने नागरिकांना दिलासा देणे गरजेचे आहे. देशात आकांडतांडव माजलेला असताना आता तरी केंद्र सरकारने झोपेतून जागे व्हावे व महागाई नियंत्रणासाठी पावले उचलावी अशा आशयाचे निवेदन खटाव येथे तहसीलदारांना देण्यात आले. यावेळी खटाव तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते

error: Content is protected !!