लिंब, कण्हेर, ठोसेघर आरोग्य केंद्रांना मिळाल्या नवीन रुग्णवाहिका

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा जिल्हा परिषदेमार्फत सातारा तालुक्यातील लिंब, कण्हेर, ठोसेघर या प्राथमिक आरोग्य केंद्रांना अत्याधुनिक सुविधांनी युक्त नवीन रुग्णवाहिका देण्यात आल्या. सातारा पंचायत समितीच्या आवारात या तीनही रुग्णवाहिकांचे आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषदेच्या सदस्य श्रीमती वनिता गोरे, सौ. मधू कांबळे, सौ. कमल जाधव, प्रतीक कदम, पंचायत समितीच्या सभापती सौ. सरिता इंदलकर, उप सभापती अरविंद जाधव, सदस्य राहुल शिंदे, जितेंद्र सावंत, दयानंद उघडे, आनंदराव कणसे, सौ. छाया कुंभार, गट विकास अधिकारी सौ. सुवर्णा चव्हाण, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. पवार, डॉ. स्वप्नील धर्माधिकारी, डॉ. रायबोले, डॉ. मेहता, डॉ. मानसी पाटील, डॉ. अरुण पाटोळे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. 

शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, दिवसेंदिवस कोरोनाचे संकट अधिकच गडद होत आहे. कोरोना महामारी रोखणे हि काळाची गरज असून त्यासाठी सामूहिक प्रयत्न झाले पाहिजेत. कोरोनावर मात करण्यासाठी ग्रामीण भागातील रुग्णांसाठी प्रत्येक आरोग्य केंद्रावर चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध असणे गरजेचे आहे.

शहरासह ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. सातारा तालुक्यातील लिंब, कण्हेर आणि ठोसेघर याठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र असून त्या- त्या भागातील रुग्ण मोठ्या संख्येने उपचारासाठी या केंद्रांवर येत असतात. ठोसेघर हा दुर्गम आणि डोंगराळ भाग असल्याने तसेच लिंब आणि कण्हेर आरोग्य केंद्राच्या अखत्यारीत आसपासची अनेक गावे येत असल्याने रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी अत्याधुनिक सोयी सुविधांनी युक्त रुग्णवाहिका या तीनही आरोग्य केंद्रांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. याचा लाभ रुग्णांना होईल, असे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सांगितले.

 

error: Content is protected !!