सातारा-पुणे महामार्गावरील ‘एस’ वळण होणार इतिहास जमा

सातारा, (भूमीशिल्प वृत्तसेवा) : वाहनचालकांना जीवघेणे ठरणारे खंबाटकी घाटातील ‘एस’ वळण आणि खंबाटकी घाटाचा घाटरस्ता हे नजिकच्याच काळात इतिहासजमा होणार आहेत. या बोगद्यामुळे पुण्याहून सातार्‍याकडे येण्यासाठी एकूण आठ किलोमीटरचे अंतर कमी होणार आहे. या मार्गावरील बोगदा व रस्त्याचे काम लॉकडाउनच्या काळातही पूर्ण क्षमतेने सुरू आहे.

काही वर्षात पुण्याकडे जाणार्‍या दिशेतील खंबाटकी घाटातील धोकादायक इंग्रजी ‘एस’ आकाराच्या तीव्र उताराच्या वळणावर व घाटरस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले होते. या घटनेचे गांभीर्य पाहता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून हे धोकादायक वळण काढण्यासाठी येथे दोन बोगद्यांसह 6.46 किलोमीटरच्या रस्त्याच्या कामाला 28 फेब्रुवारी 2019 ला मंजुरी देण्यात आली. या कामाचे 493 कोटींचे बजेट आहे. हे काम सलग तीन वर्षे सुरू राहणार असून 27 फेब्रुवारी 2022 ला बोगदा व रस्त्याचे काम संपवण्याची मुदत आहे. जून 2022 ला हे काम सर्व काम संपून हा रस्ता रहदारीसाठी खुला होणार आहे.

हा एकूण 6.46 किलोमीटरचा हा रस्ता आहे. त्यामध्ये दोन्ही बाजूकडे 1.2 किलोमीटरचा बोगदा असून, पुण्याकडे जाताना बोगदा संपल्यानंतर कॅनॉलपर्यंत दरी पुलाप्रमाणे उड्डाण पूल असणार आहे, तर कॅनॉलपासून पारगाव-खंडाळा येथील सर्व्हिस रोडपर्यंत भराव रस्ता होणार आहे.
हे काम पूर्ण झाल्यानंतर सध्या वापरात असलेला सातार्‍याहून पुण्याकडे जाताना सध्या वाहतूक सुरू असलेला बोगदा रस्ता हा पूर्णपणे बंद राहणार आहे. त्यामुळे धोकादायक ‘एस’ आकाराचे वळणही इतिहासजमा होणार आहे.

पुण्याहून सातार्‍याला जाण्यासाठी सध्या सुरू असलेला व घाट चढून जाणारा खंबाटकी घाटरस्ता हा आपत्तीकालीन परिस्थितीवेळी सुरू राहील. सातारा बाजूकडे या बोगद्याला सुशोभित करण्यात येणार असून, विविध झाडे, फुलझाडे व गोल डिझाइन बनविण्यात येणार आहे, तर पुणे बाजूकडे उड्डाण पूल बनविण्यात येणार आहे. तेथेही सुशोभीकरण करण्यात येणार आहे.सध्या, कोरोना काळातही नियम पाळून बोगद्याचे काम गायत्र प्रोजेक्टकडून सुरू असून एकूण 15 टक्के काम पूर्ण झाले आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य महामार्ग प्राधिकरणाकडून देण्यात आली.

error: Content is protected !!