पुणे-सातारा महामार्गावर टोलमुक्तीची गडकरींची घोषणा

पुणे, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील टोल रद्द करण्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली. या रस्त्यावरील अपूर्ण कामांसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून ५० कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल, तसेच या रस्त्यावर होणारे अपघात व आवश्यक उपाययोजनांच्या अभ्यासाचे काम एक संस्था करत असून, लवकरच अहवाल सादर होईल, अशीही माहिती त्यांनी दिली.राष्ट्रीय महामार्गांवरील विविध रस्ते व पुलांच्या १३४ कोटी रुपयांच्या कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण शुक्रवारी गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी गडकरी यांनी टोलमुक्तीची महत्त्वाची घोषणा केली. या मागणीसाठी विविध संघटना गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलन करत होत्या. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार, विधान परिषदेच्या उपाध्यक्ष डाॅ. नीलम गोऱ्हे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार गिरीश बापट, सुप्रिया सुळे आदी उपस्थित होते.

पुण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या दोन रस्त्यांची कामे हाती घेतली आहेत. त्यापैकी एक पुणे-बंगळुरू महामार्ग आहे. या महामार्गावर ‘ग्रीन हायवे ऍक्सीस कंट्रोल’ बांधला जात आहे. या रस्त्यावर नवीन पुणे विकसित करण्याचा विचार करा. यामुळे भविष्यात पुण्यातली गर्दी, वाहतूककोंडी कमी होईल,” असा सल्ला नितीन गडकरी यांनी अजित पवार यांना दिला. या महामार्गाचे सादरीकरण लवकरच महाराष्ट्र सरकारला देऊन कामाला सुरुवात करू, असे ते म्हणाले.

पुण्यातली गर्दी ‘अशी’ वळवणार “आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू आणि केरळ या राज्यांमध्ये उत्तरेतील पंजाब, हरयाणा, राजस्थान, गुजरात, दिल्ली, हिमाचल, उत्तराखंड येथून जाणारी वाहतूक मुंबईतून जाते. ही वाहतूक सुरतलाच थांबवण्याचे ठरवतो आहे. सुरतपासून नाशिक, अहमदनगर, सोलापूर, अक्कलकोट, गुलबर्गा, यादगीर, कर्नुल ते चेन्नई असा १२७० किलोमीटर लांबीचा महामार्ग बांधला जाणार आहे. यासाठी ४० हजार कोटी रुपये खर्च करणार आहोत. यामुळे मुंबई-पुण्यातली वाहतुकीची गर्दी कमी होईल. शिवाय सध्याचा सोळाशे किलोमीटरचा महामार्ग १२७० किलोमीटरचा होईल. यामुळे दिल्ली-चेन्नई प्रवासात ८ तासांची बचत होईल,” असा विश्वास नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

error: Content is protected !!