नियमभंगप्रकरणी चालकांवर कारवाईचा बडगा


सातार्‍यात पाच दिवसांत सुमारे 16 लाखांचा विक्रमी दंड वसूल

सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा) : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली असताना लॉकडाऊन संदर्भातील नियमांचे अधिकाधिक पालन करण्याऐवजी नियमांची पायमल्ली होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर नियमभंग करणार्‍या शहर व परिसरातील दुचाकी- चारचाकी चालकांवर सातारा शहर वाहतूक शाखेच्या वतीने कारवाई करण्यात आली. दि. 3 जुलैपासून आजअखेर एकूण 16 लाख 24 हजार 400 रुपये एवढा विक्रमी दंड या कारवाईदरम्यान वसूल करण्यात आला.

जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी 1822 चालकांवर कारवाई करण्यात येऊन 9 लाख 11 हजारांचा दंड वसूल केला गेला. पोवई नाका, मोती चौक, वाढे फाटा, बॉम्बे रेस्टॉरंट येथे नियमभंगप्रकरणी आतापर्यंत 65 वाहने ताब्यात घेण्यात आली आहेत. या कारवाईत शाहूपुरी पोलीस आणि सातारा शहर वाहतूक पोलिसांनी सहभाग घेतला. दरम्यान, वाहतुकीचे नियम न पाळणार्‍या वाहनचालकांवरही शहर वाहतूक शाखेच्यावतीने कारवाई करण्यात आली. अशा 3154 वाहनचालकांवर कारवाई करून त्यांच्याकडून 7 लाख 15 हजार 400 रुपयांचा दंड वसूल केला गेला. दरम्यान, कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी शासनाच्या नियमांचे पालन करून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन शहर वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक विठ्ठल शेलार यांनी केले आहे.




error: Content is protected !!