राजकारणात सक्रिय होण्याचा विचार नाही : वृषालीराजे भोसले

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : श्रीमंत छ. स्व. सुमित्राराजे भोसले, श्रीमंत छ. स्व. चंद्रलेखाराजे भोसले यांनी सामाजिक कार्याचा वारसा अखंडपणे चालवला. तोच वारसा पुढे चालवण्यासाठी मी आयुष्यभर काम करणार आहे, असे सांगत, छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज श्रीमंत छ. वृषालीराजे भोसले यांनी सध्या राजकारणात सक्रिय होण्याचा विचार नसल्याचे स्पष्ट केले.

साताऱ्याचे माजी नगराध्यक्ष श्रीमंत छ. शिवाजीराजे भोसले यांच्या कन्या श्रीमंत छ. वृषालीराजे भोसले सध्या सातारा शहर व जिल्ह्याच्या समाजकारणात सक्रिय झाल्या आहेत. क्रीडांगणाच्या अनुषंगाने विकासकामे करण्यासाठी त्यांनी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची नुकतीच भेट घेतली होती. त्यांनी सुचवलेल्या कामांना प्राधान्य देवून निधी देण्याची ग्वाही दोघांनी दिली होती.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी, आज त्यांनी पोवई नाका येथील शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यास अभिषेक करुन पुष्पहार अर्पण केला. तद्नंतर नगरपालिका, राजवाडा व शनिवार पेठेतील बालविकास मंडळातर्फे आयोजित शिवजयंतीच्या कार्यक्रमास उपस्थितीत राहून छत्रपती शिवरायांना अभिवादन केले. सोन्या मारुती मित्रमंडळाच्या शिवज्योतीचे स्वागत त्यांनी केली. त्यानंतर शिर्के शाळा येथे आयोजित बास्केट बॉल स्पर्धेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. सायंकाळी पोवई नाका मित्र मंडळातर्फे आयोजित व्याख्यान, भावगीत कार्यक्रमाचे उद्घाटन वृषालीराजेंनी केले. त्यांच्या समवेत पूत्र श्रीमंत कौत्सुभादित्यराजे उपस्थितीत होते.

या प्रसंगी श्रीमंत छ. वृषालीराजे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, आजी श्रीमंत छ. सुमित्राराजे भोसले यांनी सामाजिक कार्यात अनमोल योगदान दिले आहे. समाजकार्यात सक्रिय राहत त्यांनी लोकांना अदालत वाड्यातून न्याय देण्याचे काम केले. आई श्रीमंत छ. चंद्रलेखाराजे यांनीही तोच वारसा कायम ठेवला. वडील श्रीमंत छ. शिवाजीराजे भोसले यांनी सातारा पालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्षपदाचा कारभार सांभाळत सातारा शहराच्या विकासात योगदान दिले. तसेच त्यांनी लोकोपयोगी काम केले. छत्रपती घरणाच्या आदर्शाने तोच वारसा अखंडीत पुढे चालू ठेवणार आहे. वडीलांचा आदेश मानून लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सक्रिय राहणार आहे

error: Content is protected !!