नो मास्क..? नो गोल्ड, नो मिठाई !


मिठाई व्यापारी संघटना आणि सराफ व सुवर्णकार असोसिएशनचा सातारकरांच्या हितासाठी निर्णय
सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा) : मिठाई असो किंवा सोने या पुढे या दोन्ही वस्तू खरेदी करण्यास येणार्‍या ग्राहकांनी मास्क परिधान करूनच दुकानात यावे अन्यथा त्या दिल्या जाणार नाहीत. सातारा मिठाई संघटना आणि सातारा सराफ व सुवर्णकार असोसिएशन यांनी ‘नो मास्क, नो गोल्ड, नो मिठाई’ असा निर्णय सातारकरांच्या आरोग्य हितासाठी एकमताने घेतला आहे.

‘मीच माझ्या सातारकरांचा रक्षक’ या संघटनेने कोरोना या आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये आणि कोरोनासह आता दैनंदिन व्यवहार सुरू ठेवून जगायला शिकलेच पाहिजे यासाठी सातार्‍यात ‘सवयभान’ हे अभियान राबविण्यास सुरवात केली आहे. या अभियानास जनतेतून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या अभियाना अंतर्गत डॉ. रेवले व पोलिस वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक शेलार यांनी मिठाई व्यापार्‍यांना कोरोनाविषयी प्रबोधन आणि मार्गदर्शन केले. यावेळी ‘मीच माझ्या साताकरांचा रक्षक’चे संस्थापक राजेंद्र चोरगे, अध्यक्ष वसंतशेठ जोशी, जयेंद्र चव्हाण, सचिव मनोज देशमुख व सदस्य यशवंत गायकवाड यांनी मिठाई ग्रुपला व्यवसायाच्या ठिकाणी मास्क आणि ‘सवयभान’चे नियम किती महत्त्वाचे आहेत हे पटवून दिले.
    रक्षक ग्रुपच्या आवाहनाला प्रतिसाद देत सातारा मिठाई संघटनेचे अध्यक्ष भावरशेठ राजपुरोहित आणि भरतशेठ राऊत यांच्या उपस्थितीत सर्व मिठाई व्यापार्‍यांनी एकमताने सातारच्या आणि स्वतःच्या सुरक्षतेसाठी नो मास्क, नो मिठाई असा निर्णय घेतला.
‘नो मास्क, नो गोल्ड’
दरम्यान, याच पार्श्वभूमीवर सातारा सराफ व सुवर्णकार असोसिएशननेही ‘नो मास्क, नो गोल्ड’ असा निर्णय घेतला आहे. या निर्णयाबद्दल सातारा सराफ व सुवर्णकार असोसिएशनचे अध्यक्ष नंदकुमार बेनकर, प्रवीण देवी, आनंदा देवी, किशोर घोडके, पंकज टंकसाळे, धनंजय पारखी या सदस्यांचे रक्षक ग्रुपचे उपाध्यक्ष चंद्रशेखर घोडके, सचिव मनोज देशमुख व खजिनदार श्रेणीक  शहा यांनी स्वागत केले. यावेळी भरतशेठ राऊत, यशवंत गायकवाड, सौरभ रायरीकर, सुयश लुनावत, प्रवीण राठी, भरत वैष्णव, सुरेश बोहरा उपस्थित होते.
हा आदर्श इतर व्यावसायिकांनीही घ्यावा : राजेंद्र चोरगे
‘नो मास्क, नो गोल्ड, नो मिठाई’ हा मिठाई व्यावसायिक आणि सराफ व सुवर्णकार असोसिएशनने घेतलेला निर्णय स्तुत्य असून त्याचा आदर्श सातार्‍यातील इतर व्यावसायिकांनीही घ्यावा, असे आवाहन रक्षक संघटनेचे सदस्य राजेंद्र चोरगे यांनी केले आहे.
 
error: Content is protected !!