सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांच्या ‘सह्याद्री वाचवा’ मोहीमेला मोठे यश
सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा): झाडाणी ता. महाबळेश्र्वर येथील बेकायदेशीर जमीन खरेदी केल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी केलेल्या तक्रारीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तिघांना कमाल जमीन धारणेतंर्गत नोटीसा बजावल्या होत्या. तसेच श्री. मोरे यांनी बेमुदत उपोषण केल्यानंतर ४० एकरावरील अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश दिले असतानाच आता या प्रकरणाला आणखी एक नवीन वळण मिळाले असून सखोल चौकशीअंती जिल्हाधिकाऱ्यांनी आणखी आठ जणांना कमाल जमीन धारणेतंर्गत नोटीसा बजावून गुरुवार दि.२० जून रोजी उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.
माहिती अधिकार, सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी ‘सह्याद्री वाचवा’ मोहीम हाती घेऊन सह्याद्रीच्या खोऱ्यातील अनेक बेकायदेशीर कृत्यांची माहिती मिळविली. त्यामध्ये गेल्या महिन्यात झाडाणी (ता. महाबळेश्वर) येथील तब्बल ६२० एकर जमीन जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी आणि त्यांच्या नातेवाईकांनी बळकावल्याचे मोरे यांनी सबळ पुराव्यासह उजेडात आणून त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी वाई प्रांतांधिकाऱ्याना सदर प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. प्रांतांनी सादर केलेल्या अहवालात अनेक बाबी स्पष्ट होऊन तक्रारीत तथ्य असल्याचे समोर आल्यानंतर जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी महाराष्ट्र शेतजमीन अधिनियम १९६१ नुसार निश्चित केलेल्या जमीन धारणेची कमाल मर्यादापेक्षा जास्त जमीन धारण केल्याचा ठपका ठेवून जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी, अनिल वसावे, पियुष बोगीरवार यांना नोटीस काढली होती. याप्रकरणी ११ जून रोजी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनात सुनावणीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार त्यादिवशी सुनावणी होऊन नोटीस धारकांना म्हणणे मांडण्यासाठी पुढील दि.२० जून तारीख देण्यात आली होती त्यानुसार गुरूवारी याप्रकरणाची सुनावणी होणार आहे.
दरम्यान या प्रकरणाचा सविस्तर अहवाल प्राप्त झाला असून यामध्ये अनेक जणांचा समावेश असल्याची माहिती प्रांतांनी सविस्तर दिलेल्या अहवालात नमूद केली आहे. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणी आणखी आठ जणांना कमाल जमीन धारणेतंर्गत नोटीसा बजावल्या आहेत. सदरच्या नोटीस ह्या वळवी यांचे नातेवाईक श्रीमती रत्नप्रभा अनिल वसावे, दिपेश अनिल वसावे, श्रीमती संगीता चंद्रकांत वळवी, श्रीमती अरुणा बोंडाळ, गौतम मोहन खांबदकोन, आरमान चंद्रकांत वळवी, आदित्य चंद्रकांत वळवी, दिपाली दिलीप मुक्कावार या आठ जणांना बजावल्या असून गुरुवार दि.२० जून रोजी आवश्यक ती कागदपत्रे आणि लेखी म्हणणे घेऊन उपस्थित राहण्याचे आदेश दिले असून यादिवशी उपस्थित राहून कागदपत्रे सादर न केल्यास आपणास काही एक सांगावयाचे नाही असे गृहित धरून जास्तीची जमीन सरकार जमा करण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल असा इशाराही बजावलेल्या नोटीशीत देण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रकरणी काय कारवाई होणार याकडे राज्यासह देशाचे लक्ष लागले असून सध्या होत असलेल्या प्रशासकीय कारवाईमुळे सुशांत मोरे यांनी सुरू केलेल्या सह्याद्री वाचवा मोहिमेचे हे मोठे यश असल्याचे बोलले जात आहे.
You must be logged in to post a comment.