सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : कास पठाराला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे. येथील फुलांचे दर्शन घेण्यासाठी वाढलेल्या पर्यटकांमुळे आणि पठारावर येणाऱ्या वाहनांमुळे येथे प्रदूषण प्रचंड प्रमाणावर वाढले आहे. हे प्रदूषण टाळण्यासाठी पर्यटन विभागाने तातडीने हालचाली सुरू केले आहेत. या पठारावर खाजगी वाहने टाळून इलेक्ट्रिक बस कशी सुरू करता येईल, याकरिता जिल्हाधिकारी ऋचेष जयवंशी यांनी पर्यटन मंत्रालयाच्या आदेशाने आज पाहणी केली.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल साताऱ्याचे प्रांत मिनाज मुल्ला जावळीचे तहसीलदार राजेंद्र पोळ, साताऱ्याचे तहसीलदार राजेंद्र जाधव, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक उत्तम सावंत, मेढा वनपरिक्षेत्राचे वनक्षेत्रपाल रंजन सिंह परदेशी व साताऱ्याचे वनक्षेत्रपाल डॉक्टर निवृत्ती चव्हाण कास पठार कार्यकारी समितीचे उपाध्यक्ष दत्तात्रय किर्दत माजी अध्यक्ष सोमनाथ जाधव सोमनाथ बुढळे इत्यादी यावेळी उपस्थित होते.
पुण्यातील पीएमपीएल व्यवस्थापक मंडळाचे जेष्ठ पदाधिकारी सुद्धा यावेळी उपस्थित होते. जिल्हाधिकारी व प्रांत मिनाज मुल्ला यांनी अनावळे गणेश खिंड मंदिर ते अटाळी यादरम्यानच्या भागाची पाहणी केली. आणावळे परिसरातील गणेश खिंड येथे विस्तीर्ण पठाराचा परिसर असल्याने येथे खाजगी वाहनांचे पार्किंग करून खाजगी मालकांच्या जमिनी भाडेपट्ट्याने घेता येईल का या संदर्भामध्ये चाचपणी सुरू झाली आहे. पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी प्रायोगिक तत्त्वावर पर्यटन स्थळांचा विकास करण्याच्या दृष्टीने काही महत्त्वकांक्षी प्रकल्प हाती घेतले आहेत, त्या अंतर्गत कास पठार येथे खाजगी वाहनांचे प्रदूषण टाळण्याकरिता फुलांचा हंगाम पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना ईबसची सफारी कशी घडवता येईल याकरिता नियोजन सुरू झाले आहे. या संदर्भातील पाहणी आज जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत केली.
तसेच स्थानिक गावातील तरुणांना रोजगार मिळावा या दृष्टीने त्यांना टुरिस्ट गाईड म्हणून शास्त्रोक्त प्रशिक्षण देऊन त्यांची या हंगामामध्ये नेमणूक करण्याचाही मानस असल्याची प्रतिक्रिया जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. यासंदर्भात बोलताना जिल्हाधिकारी ऋचेष जयवंशी म्हणाले, ही प्राथमिक चाचणी पहिल्या टप्प्यातील असून येथे कितीही बस धावणार या संदर्भातील पुढील विकासाचे नियोजन काय आहे, याचे स्पष्ट निर्देश पर्यटन मंत्रालयाकडून येणे बाकी आहे. मात्र ई- बस जर सुरू झाली तर त्याच्या पायाभूत सुविधा कशा निर्माण करता येतील, याकरिता हा आजचा पाहणी दौरा आहे. पुढील आठवड्यामध्ये कास कास पठार समितीचे सदस्य पर्यावरण तज्ञ तसेच येथील स्थानिक ग्रामस्थ यांच्याशी चर्चा करूनच सर्वसमावेशक आराखड्याचा अहवाल पर्यटन मंत्रालयाला पाठवला जाणार आहे.
You must be logged in to post a comment.