पर्यटकांच्या सुरक्षेसाठी आता मुंबईतही ‘पर्यटन सुरक्षा दल’ : पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

महाबळेश्वर-पाचगणीच्या यशस्वी मॉडेलवर आधारित उपक्रम

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा) : राज्यातील पर्यटनस्थळांवर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘पर्यटन सुरक्षा दल’ या उपक्रमाची व्याप्ती आता मुंबईपर्यंत वाढवण्यात येत आहे. महाबळेश्वर आणि पाचगणी येथे सुरू झालेल्या या उपक्रमाला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि यश पाहता, गेटवे ऑफ इंडिया, नरिमन पॉईंट, ट्रायडंट-मलबार हिल रस्ता व वीव्हिंग गॅलरी परिसरात लवकरच हे सुरक्षा दल तैनात करण्यात येणार आहे, अशी माहिती पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

महाबळेश्वर आणि पाचगणी येथे मे महिन्यात सुरू झालेल्या पर्यटन सुरक्षा दलाच्या कामगिरीचा आढावा खुद्द पालकमंत्री देसाई यांनी घेतला. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने, एमटीडीसीचे वरिष्ठ व्यवस्थापक हनुमंत हेडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, पोलीस उपअधीक्षक भालचीम आदी मान्यवर उपस्थित होते.

गेल्या तीन महिन्यांत या दलातील जवानांनी उत्कृष्ट कामगिरी करत गर्दीचे नियोजन, वाहतूक सुरळीत ठेवणे, पर्यटकांमध्ये वादावादी टाळणे, रॅश ड्रायव्हिंगला आळा घालणे यासारख्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. या यशस्वी अनुभवाच्या आधारावरच मुंबईतील प्रमुख पर्यटनस्थळी दलाची स्थापना होणार आहे, असे देसाई यांनी सांगितले.पर्यटन सुरक्षा दल ही संकल्पना राज्यात प्रथमच महाबळेश्वर व पाचगणीत राबविण्यात आली असून, या दलात महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळाचे अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत आहेत. मुंबईत मात्र हे काम महाराष्ट्र राज्य माजी सैनिक कल्याण मंडळाच्या अधिकाऱ्यांमार्फत पार पाडले जाणार आहे.

पर्यटन महामंडळाकडून या दलासाठी चारचाकी व दुचाकी वाहने खरेदी केली जाणार आहेत. तसेच या जवानांसाठी राहण्याची व्यवस्था, कायद्याचे प्राथमिक प्रशिक्षण आणि आवश्यक सुविधा देण्यात येणार असल्याची माहितीही पर्यटनमंत्री देसाई यांनी दिली.

error: Content is protected !!