सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : पिंपरी-चिंचवड शहरातील चिखली येथे आढळलेली मुघल कालीन तब्बल २ हजार ३५७ ग्रॅम वजनाची सोन्याची २१६ नाणी पुणे पुरातत्व विभागाकडून साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाकडे सुपूर्द करण्यात आली आहेत.
पुण्यातील पिंपरी-चिंचवडजवळील चिखली येथे काही महिन्यांपूर्वी घराचे बांधकाम सुरू होते. या बांधकामासाठी खोदकाम करत असताना तांब्याचा चरवीच्या आकाराचा मोठा गढवा (भांडे) सापडला होता. या गढव्यात सोन्याची तब्बल २१६ नाणी सापडली असून, त्यांचे वजन २ हजार ३५७ ग्रॅम इतके आहे. या नाण्यांच्या वाटपावरून सुरू झालेल्या वादावादीनंतर हा प्रकार उघडकीस आला. यानंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेने सर्व नाणी ताब्यात घेऊन ती पुरातत्वकडे हस्तांतरित केली.
ही नाणी सिराजउद्दीन मोहम्मद शहा बहादूर दुसरा याच्या काळातील व १८३५ ते १८८० या कालखंडातील असावीत, असा निष्कर्ष पुरातत्व विभागाने काढला आहे. पुणे, मुंबई व नजीकच्या शहरांत शासकीय वस्तुसंग्रहालय नसल्याने पुणे पुरातत्व विभागाकडून ही नाणी साताऱ्यातील संग्रहालयाकडे सुपूर्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार पुरातत्व व वस्तूसंग्रहालय संचालनालयाचे संचालक तेजस गर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पुरातत्त्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वाहने यांनी छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाचे अभिरक्षक प्रवीण शिंदे यांच्याकडे सोन्याची २१६ नाणी व तांब्याचा गडवा सुपूर्द केला. यावेळी संग्रहालयाचे कर्मचारी गणेश पवार, अजित पवार, कुमार पवार, विनोद मतकर, देवदान भांबळ आदी उपस्थित होते. आजवरच्या इतिहासात प्रथमच सोन्याची नाणी संग्रहालयाच्या खजिन्यात जमा झाली असून, पुरातत्वकडून या नाण्यांचे संवर्धन केले जाणार आहे.
You must be logged in to post a comment.