माथाडी नेते आ.शशिकांत शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त गरीब विद्यार्थ्यांच्या हाती विकासाचा ग्रंथ

कोरेगाव,(अजित जगताप): सध्या स्पर्धेचे युग असल्यामुळे प्रत्येक तरुणांना आपल्या भवितव्याची काळजी असून स्पर्धात्मक परीक्षा देण्यासाठी गुणवत्ता सिद्ध करावी लागते त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सामाजिक न्याय विभागाचे सातारा जिल्हाध्यक्ष जिल्हाध्यक्ष रमेश अनिल उबाळे यांच्या संकल्पनेतून माथाडी नेते व माजी मंत्री आ शशिकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कोरेगाव मतदार संघातील गोरगरीब विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकांचे वितरण करण्याचा अभिनव कार्यक्रम होत आहे.

राजकीय नेत्यांचा वाढदिवस म्हणजे कार्यकर्त्यांसाठी एक प्रेरणादायक व उत्साह वाढवणारा दिवस असतो.या दिवसानिमित्त अल्पोपहार ,जेवण व भेटवस्तू गोरगरिबांना देऊन त्यांचा दुवा आपल्या नेत्याला मिळावा नेत्यांना अशी अपेक्षा असते. त्या दृष्टिकोनातूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सामाजिक न्याय विभागाचे सातारा जिल्हाध्यक्ष रमेश उबाळे , पिंटू गायकवाड, सतिश कांबळे, बंटी गंगावणे व मान्यवरांच्या इच्छेनुसार स्पर्धा परीक्षेची पुस्तके गोरगरीब विद्यार्थ्यांना भेट देण्याची अभिनव संकल्पना कार्यान्वित केली जात आहे.

या उपक्रमामुळे कोरेगाव विधानसभा मतदार संघातील सातारा, खटाव व कोरेगाव तालुक्यातील गोरगरीब सुमारे विद्यार्थ्यांना महाराष्ट्र लोकसेवा आयोग,केंद्रीय लोकसेवा आयोग अशा स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तीर्ण व गुणवत्ता यादीत येण्यासाठी मदत होणार आहे.या पुस्तकांचे अवलोकन व अभ्यास करून कोरेगाव मतदार संघातील विद्यार्थी यशस्वी झाले तर त्याचा संपूर्ण फायदा कोरेगाव मतदार संघातील विकास कामांसाठी होणार आहे.याच भावनेतून हा विधायक उपक्रम राबवण्यात येत आहे.आतापर्यंत विविध स्पर्धेसाठी उपयुक्त ठरणाऱ्या पुस्तकांची यादी यशस्वी झालेल्या व अधिकारी म्हणून सध्या शासकीय सेवेत असणाऱ्या विद्यार्थ्यांकडून घेऊन सदरची पुस्तके खरेदी करण्यात आलेली आहेत.

दरम्यान,या उपक्रमासाठी सुमारे लाखभर रुपये खर्च केला असून खऱ्या अर्थाने ही लाख मोलाची कामगिरी केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार ,खा.सुप्रिया सुळे, खा .श्रीनिवास पाटील,आ.बाळासाहेब पाटील, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तसेच आ.शशिकांत शिंदे यांच्यासह विविध राजकीय पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी रमेश उबाळे यांचे मनापासून कौतुक केले आहे.

या स्पर्धा परीक्षेसाठी लागणारी पुस्तके गरीब विद्यार्थ्यांनी इतर गरीब विद्यार्थ्यांना आपले वाचन झाल्यानंतर देवून मनाचा मोठेपणा दाखवावा जेणेकरून कोरेगाव मतदार संघात स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकापासून कुणीही वंचित राहणार नाही असेही आवाहन रमेश उबाळे यांनी केले आहे.

error: Content is protected !!