महामार्गावर मालखेडनजीक अपघातात दुचाकीस्वार ठार

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : महामार्गाकडेला उभा असलेल्या मालट्रकला दुचाकीची पाठीमागून धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीवरील युवक जागीच ठार तर एकजण गंभीर जखमी झाला. पुणे-बंगलोर आशियाई महामार्गावर मालखेड हद्दीत बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

इराप्पा प्रभू हडपद (वय २०) असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. तर विठ्ठल चंद्रमा हडपद (वय ३५, दोघेही सध्या रा. अर्बन बँकेच्या पाठीमागे, कार्वेनाका ता. कऱ्हाड व मूळ रा. दूदलगी, विजापूर) असे अपघातात गंभीर जखमी झालेल्या इसमाचे नाव आहे.

अपघातस्थळ व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार, पुणे-बंगळूर आशियाई महामार्गावर पुणे-कोल्हापूर लेनवर मालट्रक (एमएच १४ एफटी ४९९४) हा डिझेल संपल्यामुळे उभा होता. इराप्पा हडपद व विठ्ठल हडापद हे दोघे दुचाकी (एमएच ५० यु ८०१३) वरून कऱ्हाडकडून कोल्हापूर दिशेला जात होते. बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास दुचाकी मालखेड गावच्या हद्दीत आली असता उभा असलेल्या मालट्रकला पाठीमागून धडक दिली. धडक येवढी जोरात होती की या अपघातात एकजण जागीच ठार झाला तर एकजण गंभीर जखमी झाला. जखमीला उपचारासाठी येथील कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग देखभाल विभागाच्या कर्मचारी उदय यादव, श्रीधर जाखले, अक्षय रेळेकर, नितीन विरकर यांच्यासह कऱ्हाड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अशोक भापकर घटनास्थळी दाखल झाले. अपघातानंतर विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत केली. जखमींना मदत करून घटनेचा पंचनामा केला. अपघाताची नोंद कऱ्हाड तालुका पोलीस ठाण्यात झाली आहे. पोलीस उपनिरीक्षक भापकर तपास करीत आहेत.

error: Content is protected !!