सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : जन जीवनाशी अत्यंत महत्त्वाच्या पद्धतीने निगडित असलेल्या शासनाच्या “जल जीवन मिशन” मध्ये सातारा जिल्ह्याने 2020-21 मध्ये दिलेल्या उद्दिष्टानुसार 1 लाख 47 हजार 60 इतकी वैयक्तिक नळजोडणी पूर्ण करून शंभर टक्के उद्दिष्टपूर्ती केली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली.
प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की,” दोन हजार वीस- एकवीस सालासाठी एक लाख 47 हजार 60 इतके नळ जोडणी चे उद्दिष्ट होते. तथापि सातारा जिल्ह्याने एक लाख 47 हजार 632 इतकी उद्दिष्टपूर्ती केली आहे. या उद्दिष्टपूर्ती ची टक्केवारी 100.39 टक्के इतकी आहे.” जल जीवन मिशन ही केंद्र पुरस्कृत योजना असून त्यामध्ये राज्य आणि केंद्राचा प्रत्येकी 50 टक्के हिस्सा आहे,अशी माहिती देऊन पुढे म्हटले आहे की, “2024 सालापर्यंत प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला कार्यात्मक वैयक्तिक नळजोडणी द्वारे प्रति व्यक्ती रोज किमान 55 लिटर गुणवत्तापूर्ण पाणी पुरवण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे.’ हर घर नल से जल’ असे घोषवाक्य घेऊन 2020-21 सालापासून जल जीवन मिशन सुरू करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक व्यक्तीला स्वयंपाक आणि इतर घरगुती वापरासाठी स्वच्छ आणि पुरेसा पाणीपुरवठा सर्व परिस्थितीत शाश्वत पद्धतीने मिळावा असे मोठे उद्दिष्ट जनजीवन मिशनचे आहे,” असे देखील प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे .त्यानुसार सातारा जिल्ह्याने दोन हजार वीस एकवीस चे उद्दिष्ट मिळाल्यानंतर सर्व पातळ्यांवर यंत्रणा कार्यान्वित केली. ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, ग्रामपंचायत विभाग, पाणी व स्वच्छता विभाग यांनी काटेकोर नियोजन केले. तालुका पातळीवर ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग, गटविकास अधिकारी, ग्रामसेवक, ग्रामपंचायत विस्ताराधिकारी अशा सर्वच घटकांनी याबाबत योग्य नियोजन केले . ग्रामीण जनतेचीही उत्कृष्ट साथ मिळत आहे. त्यामुळे शंभर टक्के उद्दिष्टप्राप्ती झाली असे देखील मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकात आवर्जून नमूद केले आहे. जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामीण कुटुंबास वैयक्तिक नळजोडणी मिळावी, स्वच्छ पुरेसे पाणी उपलब्ध व्हावे हे व्यापक उद्दिष्ट आहे. याच प्रकारे दरवर्षी काटेकोर नियोजन करून शंभर टक्के उद्दिष्टपूर्ती केली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
You must be logged in to post a comment.