सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : महाबळेश्वरपासून ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या खरोशी (ता. महाबळेश्वर) येथे उपचाराअभावी डालग्यातच प्राण सोडण्याची वेळ एकावर आली. बावीस जुलैच्या अतिवृष्टीनंतर तुटलेला गावाचा संपर्क पुन्हा जोडण्यात प्रशासनाला अपयश आल्याने ही दुर्दैवी घटना घडलीय.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, खरोशी येथील रामचंद्र मानू कदम हे आजारी होते. त्यांना दवाखान्यात नेण्यासाठी खरोशी गावाला चतुरबेट मार्गे महाबळेश्वरकडे जोडणारा रस्ता बंद आहे. तर रेनोशी मार्गे कोट्रोशी पुलावरून तापोळ्याला जाणारा रस्ताही दरड कोसळल्याने बंद आहे. दि. २२ तारखेला झालेल्या पावसामध्ये रस्त्याची दुरवस्था झाल्याने गावच संपर्कहीन आहे. तर आतापर्यंत गावामध्ये जाण्या-येण्यासाठी रस्ताच सुरू झाला नसल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. यातच शुक्रवारी खरोशी गावामध्ये दुःखद घटना घडली. रामचंद्र कदम (वय ७५) यांच्या छातीमध्ये कळ मारत होती. त्यांना डॉक्टरांकडे घेऊन जाण्यासाठी कोणताच पर्याय नव्हता. मोबाईल नेटवर्कही उपलब्ध नव्हते. त्यामुळे तापोळ्यातून स्पीडबोट सुद्धा मागवता आली नाही. अखेर बाजूच्या रेनोशी गावामधून लॉन्च मागवण्यात आली. रामचंद्र कदम यांना डालग्यात भरून लॉन्चपर्यंत नेण्यात आले. मात्र, तोपर्यंत दोन ते अडीच तास गेले आणि कदम यांचा डालग्यातून नेतानाच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
You must be logged in to post a comment.