व्हिडिओ रेकॉर्डिंग करून व्हायरल करणे गुन्हा : पोलीस अधीक्षक समीर शेख
वडूज ,(भूमिशिल्प वृत्तसेवा) : माण – खटाव मतदार संघातील गोपूज येथील मतदान कक्षात मतदान करतेवेळी मोबाईलवर ईव्हीएम आणि व्हीव्ही- पॅटसोबतचा फोटो व व्हिडिओ करत असताना आढळून आल्याने एकास ताब्यात घेण्यात आले असून त्याच्या विरोधात औंध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने आज बुधवारी सुरू असलेल्या मतदानाप्रसंगी गोपूज ता.खटाव येथील मतदान केंद्रावर आपले मतदान करताना संबंधीत व्यक्तीने मतदान कक्षामध्ये मोबाईलद्वारे चित्रीकरण केले. त्यावेळी येथील अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी त्यास अटकाव करून ताब्यात घेतले.मा.भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानूसार मतदान कक्षात मोबाईल घेऊन जाण्यास बंदी असतानाही सदर व्यक्तीने मतदान प्रक्रियेचे चित्रीकरण केले. त्यामुळे त्याचेवर कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
व्हिडिओ रेकॉर्डिंग करणे आणि ते प्रसारित करणे गुन्हा : समीर शेख
मतदानाला जाताना मतदारास मोबाईल वापरता येणार नाही, असे निर्देश निवडणूक आयोगाचे आहेत. त्यामुळे मतदारांनी मतदानाला जाताना मोबाईल नेऊ नये. मतदान गोपनीय असल्याने त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करणे आणि ते प्रसारित करणे गुन्हा आहे. असे करणाऱ्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल होवू शकतो त्यामुळे कोणीही असे गैरप्रकार करू नयेत, सर्वांनी शांततेत मतदान करावे असे आवाहन करून गैरप्रकार करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिला आहे.
You must be logged in to post a comment.