जेली चॉकलेट घशात अडकून एक वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू

सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा) : जेली चॉकलेट घशात अडकल्याने एक वर्षाच्या मुलीचा दुर्देवी मृत्यू झाला.घटना समोर आल्यानंतर मुलीच्या आईने चिमुकलीला तातडीने रुग्णालयात नेले. मात्र उपचारापूर्वीच तिचा अंत झाला होता. ही धक्कादायक घटना सातार्‍यातील कर्मवीरनगरामध्ये घडली असून घटनेनंतर मातेने केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता.

शर्वरी सुधीर जाधव (वय 1 वर्षे, रा. कर्मवीरनगर, कोडोली, सातारा) असे घशात चॉकलेट अडकून मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ही घटना रविवारी रात्री घडली आहे. शर्वरी तिच्या लहान मैत्रिणीसोबत खेळत होती. यावेळी तिच्या मैत्रिणीने शर्वरीला खाण्यासाठी जेली चॉकलेट दिले. शर्वरीने चॉकलेट खाताच ते तिच्या घशात अडकल्याने ती खोकू लागली. पाहता पाहता यानंतर ती बेशुद्ध पडली. शर्वरीच्या आईच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी घराशेजारी राहणारे जाधव यांना बोलावून घेतले. त्यांनी तातडीने शर्वरीला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.
दवाखान्यात आणल्याने शर्वरीला काही होणार नाही, असे तिच्या आईला वाटले. मात्र डॉक्टरांनी तिला तपासले असता ती मृत झाल्याचे सांगितले. या घटनेनंतर तिच्या आईने केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. या घटनेची माहिती कुटुंबिय व नातेवाईकांना समजल्यानंतर त्यांनी रुग्णालयात धाव घेतली. या घटनेनंतर सातार्‍यात हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, सातारा शहर पोलिस ठाण्यात वैद्यकीय अधिकारी डॉ. साळुंखे यांनी पोलिसांना माहिती दिली असून घटनेची नोंद झालेली आहे

error: Content is protected !!